पाकिस्तानने आशिया चषकातून माघार घेत उर्वरित सामन्यांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असता तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं कोट्यवधींचं नुकसान झालं असतं. रागाच्या भरात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन मोहसीन नक्वी यांनी बहिष्काराचा इशारा दिला मात्र असा निर्णय झाला असता तर पाकिस्तान क्रिकेटला मोठा फटका बसला असता असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी चेअरमन नझम सेठी यांनी सांगितलं. सामा टीव्हीशी बोलताना सेठी यांनी पडद्यामागे घडलेल्या गोष्टींचा खुलासा केला. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव आणि त्याच्या सहकाऱ्यांनी पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन टाळलं होतं. त्यावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे पदाधिकारी संतप्त झाले होते. याच रागातून पीसीबीचे चेअरमन मोहसीन नक्वी यांनी बहिष्काराचा इशारा दिला होता.

तिरीमिरीत नक्वी यांनी बहिष्काराचा इशारा दिला. माझ्या मित्रांनी मला सांगितलं, जाऊ नकोस, त्यांना मदत करू नकोस. नक्वी यांना मदत करायचा माझ्या डोक्यातही नव्हतं. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या भल्यासाठी मी मध्ये पडायचा निर्णय घेतला असं सेठी यांनी सांगितलं. त्यांनी त्यांचा हेका कायम राखला असता तर पाकिस्तान क्रिकेटचं कधीही भरून येणार नाही असं नुकसान झालं असतं. आशियाई क्रिकेट परिषदेनं आमच्यावर कारवाई केली असती. आयसीसीने आम्हाला दंड केला असता. विदेशी खेळाडूंनी पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत खेळायला नकार दिला असता. या सगळ्यापेक्षाही आशिया चषकाच्या प्रक्षेपण हक्कातून मिळणाऱ्या कमाईचे १५ मिलिअन डॉलर्स एवढी प्रचंड रक्कम आम्ही गमावून बसलो असतो असं सेठी म्हणाले.

सेठी यांनी पीसीबीचे माजी चेअरमन रमीझ राजा यांनी नक्वी यांची भेट घेतली. पाकिस्तानच्या युएईविरुद्धच्या लढतीपूर्वी नक्वी, सेठी आणि राजा यांच्यात बैठक झाली. भारताच्या सामन्यानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाने सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांची हकालपट्टी करावी अशी मागणी केली होती. पायक्रॉफ्ट यांनीच कर्णधारांना हस्तांदोलन न करण्याच्या सूचना दिल्या असा आरोप पीसीबीने केला. लाहोरस्थित पीसीबी कार्यालयात सुरू असलेल्या बैठकांमुळे युएईत पाकिस्तानच्या संघाला हॉटेलमध्येच थांबायला सांगण्यात आलं. युएईचा संघ मैदानात पोहोचला, त्यांनी सरावही केला. चर्चा आणि वाटाघाटींच्या अनेक फेऱ्यांनंतर पाकिस्तानने युएईविरुद्धचा सामना खेळण्याचा निर्णय घेतला.

आयसीसीने पायक्रॉफ्ट यांची पाठराखण करत तेच सामनाधिकारी म्हणून असतील अशी भूमिका घेतली. आशिया चषकाच्या व्हेन्यू मॅनेजर यांचा संदेश दोन्ही संघांच्या कर्णधारांना देण्याचं काम पायक्रॉफ्ट यांनी केलं असं स्पष्ट झालं. दरम्यान पायक्रॉफ्ट यांनी माफी मागितल्याचा व्हीडिओ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने रिलीज केला. या सगळ्या वर्तणुकीवर आयसीसीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. बहिष्काराचा इशारा, सामनाधिकाऱ्यांवर आरोप आणि गोपनीय व्हीडिओ प्रसारित करणं यासंदर्भात आयसीसीने पीसीबीला धारेवर धरलं आहे. प्लेयर्स अँड मॅच ऑफिशियल्स एरिया कोड याचा भंग केल्याचं आयसीसीने म्हटलं आहे. मात्र माध्यम व्यवस्थापकांनी नियमांच्या विहीन राहत हा व्हीडिओ चित्रित केल्याचं पीसीबीचं म्हणणं आहे.

अंतर्गत दबाव असतानाही, परिस्थिती चिघळू नये यासाठी हस्तक्षेप करावा लागला असं सेठी म्हणाले. हे कोणा एकासाठी केलं नाही. पाकिस्तान क्रिकेटचं अस्तित्व पणाला लागलं असतं. पाकिस्तानने स्पर्धेतून माघार घेतली असती तर दीर्घकालीन आर्थिक आणि डावपेचात्मक संबंधावर परिणाम झाला असता असं सेठी यांनी सांगितलं.

सेठी यांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पाकिस्तानने बहिष्काराचा निर्णय मागे घेतला. युएईविरुद्धचा सामना तासभर उशिराने सुरू झाला पण पाकिस्तानने खेळण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने युएईला नमवत बाद फेरीत अर्थात सुपर फोरमध्ये प्रवेश केला.

पाकिस्तानने भूमिका बदलल्यानंतरही आयसीसीच्या कारवाईची टांगती तलवार कायम आहे. पाकिस्तान सुपर लीगचा ड्राफ्ट आणि आंतरराष्ट्रीय दौरे येत्या काही महिन्यात होणार आहेत. ही परिस्थिती कशी हाताळावी यासंदर्भात आयसीसी आणि एसीसी यांच्यात चर्चा सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं.