पाकिस्तानच्या संघाची विश्वचषक स्पर्धा २०१९ मधील कामगिरी फारशी चांगली होऊ शकली नाही. त्यांना ९ सामन्यात ५ विजयांसह केवळ ११ गुणच कमावता आले. त्यामुळे त्यांना गुणतालिकेत पाचव्या स्थानावरच समाधान मानावे लागले. त्यामुळे मिकी आर्थर यांना पाक संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार व्हावे लागले होते. मिकी आर्थर यांना पदावर कायम राहण्याची इच्छा असूनही त्यांची हकालपट्टी करण्यात आली. याबाबत मिकी आर्थर यांनी खंत व्यक्त केली आहे.
माझ्या कार्यकाळात सर्वात निराशाजनक बाब म्हणजे मी ज्या लोकांवर विश्वास ठेवला, त्याच लोकांनी माझा घात केला. मला महत्वाच्या काळात त्यांनी साथ दिली नाही. मा हे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांबद्दल बोलत नसून क्रिकेट समितीतील सदस्यांबाबत बोलतो आहे आणि ज्यांच्यावर मी विश्वास ठेवला होता. त्या लोकांनी मला सांगताना काही वेगळंच सांगितलं आणि केलं काहीतरी वेगळंच.. हे माझ्यासाठी अत्यंत निराशाजनक होतं, असा गौप्यस्फोट आर्थर यांनी केला.
दरम्यान, आर्थर यांच्या हकालपट्टीनंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार मिस्बाह-उल-हक यांची पाकिस्तान क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली. पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून मिस्बाह-उल-हक यांची या पदासह संघाच्या निवड समिती अध्यधपदीही निवड करण्यात आली. तर माजी गोलंदाज वकार युनिस यांना गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवडण्यात आले. मिस्बाह-उल-हक यांना तीन वर्षांच्या कालावधीसाठी करारबद्ध करण्यात आले असल्याची माहिती पाकिस्तान क्रिकेट मंडळाने सांगितले आहे.