‘सुरुवातीचे तीन बॅट्समन झटपट माघारी परतल्याने माझ्यावर एकदम जबाबदारी आली. आततायी फटका मारून बाद झालो असतो तर देशवासीयांच्या विश्वासाला तडा गेला असता. शांतपणे खेळण्यावर भर दिला. पाकिस्तानचे खेळाडू काही बोलले तर लक्ष द्यायचं नाही हेही ठरवलं होतं. जे बोलायचं ते मी बोललो आहे पण मॅच सुरू असताना नाही बोललो. बऱ्याच गोष्टी सुरू होत्या. सगळ्याच मी सांगू शकत नाही. बॅट्समन आणि बॉलर यांच्यात काही ना काही सुरू राहतं. भारत-पाकिस्तान सामन्यात हे सुरू राहतं. बॅटने उत्तर देणं कधीही चांगलं’, असं आशिया चषकात फायनलचा नायक तिलक वर्माने हैदराबादमध्ये बोलताना सांगितलं.
तिलकचं मंगळवारी हैदराबाद इथे आगमन झालं. विमानतळावर परिसरात त्याचं भव्य स्वागत करण्यात आलं. त्याला पाहण्यासाठी हजारो चाहते जमले होते. प्रचंड प्रमाणावर पोलीस आणि सुरक्षायंत्रणांचा फौजफाटा तैनात करावा लागला.
तो पुढे म्हणाला, कर्णधार सूर्यकुमारने सांगितल्याप्रमाणे भारत-पाकिस्तान द्वंद्व वगैरे म्हणतात तसं राहिलेलं नाही या वक्तव्याशी मी सहमत आहे. प्रत्येक सामना वेगळा असतो. फायनलमध्ये ते पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरतील याची आम्हाला कल्पना होती. दुसऱ्या डावात त्यांनी वेगात बदल करून बॉलिंग केली. खेळपट्टीही आव्हानात्मक होती. दडपण तर नक्कीच होतं. देशाला जिंकून देणं हेच डोक्यात होतं. मनात, मेंदूत हेच सुरू होतं. जर मी क्षमतेला साजेसा खेळ करू शकलो नाही तर देशासाठी योगदानात कमी पडलो असं वाटलं असतं. १४० कोटी लोकांच्या विश्वासाला पात्र ठरू शकलो नाही असं वाटलं असतं. बेसिक गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं. प्रशिक्षकांनी लहानपणापासून जे शिकवलं तेच अंगीकारून खेळ केला’.
‘कारकिर्दीतील आतापर्यंतच्या सर्वोत्तम खेळींपैकी एक आहे. अंतिम षटकातही माझ्यावर दडपण नव्हतं. संघाला जिंकून देईन हा विश्वास होता. संघाच्या विजयात योगदान देता आल्याचं समाधान आहे’, असं तिलकने सांगितलं.
फायनलमध्ये आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना तिलकने ५३ चेंडूत ६९ धावांची निर्णायक खेळी साकारली. अभिषेक शर्मा, शुबमन गिल आणि सूर्यकुमार यादव झटपट बाद झाल्याने तिलकवर अतिरिक्त दडपण होतं. धावांची गती राखणं आणि विकेट्सची पडझड रोखणं अशा दोन्ही आघाड्या तिलकला सांभाळायच्या होत्या. त्याने आधी संजू सॅमसनबरोबर आणि नंतर शिवम दुबेबरोबर भागीदारी रचली. दुबे बाद झाल्यानंतर तिलकवरचं दडपण वाढलं पण त्याने शानदार खेळ करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.