Pakistan Fan Plea to Haris Rauf India Ko Chhodna Nahi Goes Viral : पाकिस्तानच्या क्रिकेट संघाने आशिया चषक स्पर्धेच्या सुपर ४ फेरीतील अंतिम सामन्यात सामन्यात बांगलादेशवर शानदार विजय मिळवला आहे. या विजयासह पाकिस्तानी संघाने स्पर्धेच्या अंतिम सामन्याचं तिकीट मिळवलं आहे. त्यामुळे आशिया चषक स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना खेळवला जाणार आहे.
पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश या सामन्यात बांगलादेशच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत पाकिस्तानला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत बांगलादेशी गोलंदाजांनी पाकिस्तानला अवघ्या १३५ धावांवर रोखलं. मात्र, बांगलादेशी फलंदाज अवघं १३६ धावांचं लक्ष्य पार करू शकले नाहीत. त्यांचा संघ अवघ्या १२४ धावांत गारद झाला. शमिम होसैनव्यतिरिक्त कुठल्याही बांगलादेशी फलंदाजाला २० धावांचा टप्पा पार करता आला नाही.
पाकिस्तानी कर्णधाराचं भारताला आव्हान
दरम्यान, बांगलादेशवर विजय मिळवल्यानंतर पाकिस्तानी संघाचा आणि त्यांच्या चाहत्यांचा उत्साह वाढला आहे. तसेच, “आम्ही भारताविरोधातील सामन्यासाठी सज्ज आहोत”, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने दिली आहे. तर पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगाने थेट भारताला इशारा दिला आहे. तो म्हणाला, “मी आणि आमचा संघ आता अंतिम सामन्यासाठी खूप उत्साही आहे. पुढे काय करायचंय ते आम्हाला माहिती आहे. कुठल्याही संघाला पराभूत करण्याची आमच्या संघाकडे क्षमता आहे. आमचा संघ मजबूत आहे. रविवारी आम्ही भारताला पराभूत करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. आम्ही कोणत्याही संघाला हरवू शकू इतका मजबूत संघ आहोत.”
क्रिकेट चाहत्यांना उत्साह शिगेला
दरम्यान, पाकिस्तानी खेळाडूंपेक्षा त्यांचे चाहते भारताविरोधातील सामन्यासाठी अधिक उत्साही आहेत. पाकिस्तानी संघाने अंतिम सामन्यात भारताला पराभूत करून जुन्या पराभवांचा वचपा काढावा अशी त्यांची इच्छा आहे. ही इच्छा त्यांनी समाजमाध्यमांवरून व्यक्त केली आहे. तसेच काही प्रेक्षकांनी मैदानात पाकिस्तानी खेळाडूंसमोर आपली इच्छा बोलून दाखवली.
“इंडिया को छोडना नहीं”, चाहत्याची हॅरिस रौफला विनंती
दरम्यान, एका पाकिस्तानी चाहत्याने तर कहरच केला. त्याने थेट पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज हॅरिस रौफ याला हात जोडून विनवणी केली की “कुठल्याही परिस्थितीत भारताला पराभूत करा. आपण जखमी सिंह आहोत. अंतिम सामन्यात भारताला सोडायचं नाही” (हम जखमी शेर हैं, फायनल में उनको छोडना नहीं है, उनको छोडना नहीं…) अशा शब्दांत त्याने रौफचा उत्साह वाढवला. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायर होत आहे.