India vs Pakistan Match: रविवारी आशिया चषक स्पर्धा २०२५ मध्ये झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात टीम इंडियानं ७ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. पण त्याहीपेक्षा चर्चा झाली ती सामन्यानंतर जे घडलं त्याची! भारतीय संघानं प्रथेप्रमाणे पाकिस्तानच्या संघाशी हस्तांदोलन केलंच नाही. त्यामुळे पाकिस्तानकडून संताप व्यक्त करण्यात आला असून आयसीसीकडे तक्रारदेखील करण्यात आली आहे. पण या सर्व पार्श्वभूमीवर आगपाखड करणाऱ्या पाकिस्ताननं स्वत:च्याच एका अधिकाऱ्यावर कारवाई केली आहे. सामनाधिकारी पायक्रॉफ्ट यांच्याविरोधात वेळीच तक्रार न केल्याचा ठपका या अधिकाऱ्यावर ठेवण्यात आला आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान हस्तांदोलन प्रकार नेमका काय?

रविवारी झालेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून आधी फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानची भारतीय गोलंदाजांच्या तिखट माऱ्यासमोर भंबेरी उडाली. पाकिस्तानला फक्त १२७ धावाच करता आल्या. १२८ धावांचं आव्हान भारतीय संघानं उण्यापुऱ्या १६ षटकांत फक्त ३ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. कर्णधार सूर्यकुमार यादव व शिवम दुबे ही जोडी शेवटी मैदानावर होती. विजयासाठी तीन धावा शिल्लक असताना सूर्यकुमार यादवने उत्तुंग षटकार खेचत त्यावर शिक्कामोर्तब केलं.

पण यानंतर प्रथेप्रमाणे दोन्ही बाजूच्या खेळाडूंमध्ये हस्तांदोलन झालंच नाही. सूर्यकुमार व शिवम दुबे विजयी षटकारानंत थेट पॅव्हेलियनच्या दिशेनं निघून गेले. एवढंच नाही, तर सर्व खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये गेल्यानंतर चक्क दरवाजा लावून देखील घेतला. हे सगळं घडत असताना पाकिस्तानचा आख्खा संघ हस्तांदोलनासाठी मैदानावर उभा होता. पण एकही भारतीय खेळाडू वा स्टाफ हस्तांदोलनासाठी खाली आले नाहीत. पहलगाम हल्ल्याचा निषेध म्हणून ही कृती केल्याचं भारतीय संघानं स्पष्ट केलं आहे.

पाकिस्तानचा थयथयाट, केला निषेध

दरम्यान, भारतीय संघाच्या या कृतीवर पाकिस्तानकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. माजी पाकिस्तानी खेळाडूंनी हा खेळभावनेचा अवमान असल्याचं म्हटलं आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने यासंदर्भात आयसीसीकडे तक्रार करून सदर सामन्याचे सामनाधिकारी (मॅच रेफरी) अँडी पायक्रॉफ्ट यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

मात्र, त्यापुढे जाऊन आता पाकिस्ताननं त्यांच्याच एका पदाधिकाऱ्याची या प्रकरणात उचलबांगडी केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट विभागाचे संचालक उस्मान वाहला यांची पाकिस्ताननं हकालपट्टी केली आहे.

रविवारी सामन्यानंतर हस्तांदोलनाचा प्रकार घडल्यावर त्याबाबत तातडीने सामनाधिकारी व भारतीय संघाची आयसीसीकडे तक्रार करणं अपेक्षित असताना वाहला यांनी ते केलं नाही, हे कारण त्यांच्या निलंबनासाठी पाकिस्तानकडून देण्यात आलं आहे. सामनाधिकारी पायक्रॉफ्ट यांनीच भारतीय संघाला हस्तांदोलन न करण्यास सांगितल्याचाही आरोप पाकिस्ताननं केला असून पायक्रॉफ्ट यांना निलंबित केलं जावं, अशी मागणी करण्यात येत आहे. पायक्रॉफ्ट यांनी मेलबर्न क्रिकेट क्लब नियमावलीचं उल्लंघन केल्याचाही दावा पाकिस्ताननं केला आहे.