मुलतान : इमाम-उल-हक (१०४ चेंडूंत ६० धावा) आणि सौद शकील (१२३ चेंडूंत ५४) यांच्या झुंजार फलंदाजीमुळे पाकिस्तानला इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात विजयाच्या आशा जिवंत ठेवण्यात यश आले आहे.

इंग्लंडने दुसऱ्या डावात २७८ धावांची मजल मारत पाकिस्तानपुढे विजयासाठी ३५५ धावांचे आव्हान ठेवले. याचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवसअखेर पाकिस्तानची ४ बाद १९८ अशी धावसंख्या होती. त्यांना विजयासाठी आणखी १५७ धावांची आवश्यकता आहे. दिवसअखेर शकीलसह फहीम अश्रफ (नाबाद ३) खेळपट्टीवर होता. तसेच आगा सलमान आणि मोहम्मद नवाज हे अजून फलंदाजीला येणे बाकी असल्याने पाकिस्तानच्या आशा कायम आहेत.

तत्पूर्वी, तिसऱ्या दिवशी ५ बाद २०२ धावांवरून पुढे खेळणाऱ्या इंग्लंडचा दुसरा डाव २७५ धावांत आटोपला. हॅरी ब्रूकने (१४९ चेंडूंत १०८) कसोटी कारकीर्दीतील दुसरे शतक साकारले. पाकिस्तानकडून अब्रार अहमद (४/१२०), झाहिद महमूद (३/५२) आणि नवाज (१/४२) यांनी प्रभावी मारा केला.

३५५ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली. अब्दुल्ला शफिक (४५) आणि मोहम्मद रिझवान (३०)   यांनी ६६ धावांची सलामी दिली. मात्र, या दोघांसह कर्णधार बाबर आझम (१) झटपट बाद झाला. त्यानंतर सौद शकील आणि दुखापतीला मागे सारून फलंदाजीला आलेल्या इमामने चौथ्या गडय़ासाठी १०८ धावांची भागीदारी रचली. अखेर जॅक लिचने इमामला बाद करत ही जोडी फोडली.