Asif Afridi Debut, Pakistan vs South Africa: दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या सामन्यात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. रावळपिंडीच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज आसिफ आफ्रिदीला पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. मुख्य बाब म्हणजे त्याने वयाच्या ३८ व्या वर्षी पदार्पण केलं आहे.

या सामन्यात हसन अलीला विश्रांती देऊन आसिफ आफ्रिदीला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. वयाच्या ३८ व्या वर्षी पदार्पण करणाऱ्या आसिफ अलीच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. तो पाकिस्तानसाठी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा तिसरा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे.

प्रथम श्रेणी क्रिकेटमधील कामगिरी

वयाची ३८ वर्षे पूर्ण करणाऱ्या आसिफ आफ्रिदीला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आतापर्यंत ५७ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. दरम्यान ९५ डावात त्याने १९८ गडी बाद केले आहेत. यादरम्यान त्याने १३ वेळेस एकाच डावात ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे.

आसिफ आफ्रिदी हा पाकिस्तानसाठी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा तिसरा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. पाकिस्तानसाठी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सर्वात वयस्कर खेळाडूचा विक्रम हा मिरान बक्शच्या नावावर आहे. त्याने वयाच्या ४७ व्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तसेच अमीर एलाहीने १६ ऑक्टोबर १९५२ ला वयाच्या ४४ व्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.

कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सर्वात वयस्कर खेळाडूचा विक्रम हा इंग्लंडच्या जेम्स साउथर्टनच्या नावावर आहे. त्यांनी १८७७ मध्ये वयाच्या ४९ व्या वर्षी पदार्पण केलं होतं. २१ व्या शतकात कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सर्वात वयस्कर खेळाडूचा विक्रम हा एड जॉएसच्या नावावर आहे. त्याने ११ मे २०१८ ला आयर्लंड संघाकडून खेळताना पाकिस्तानविरुद्ध पदार्पण केलं होतं.