scorecardresearch

Video: इंग्लंडने सामना जिंकल्यानंतर पाकिस्तानच्या अलीने बेन स्टोक्सशी हस्तांदोलन करण्यास दिला नकार; जाणून घ्या कारण

दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानवर २६ धावांनी विजय मिळवला. या सामन्यानंतर बेन स्टोक्स आणि मोहम्मद अलीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Video: इंग्लंडने सामना जिंकल्यानंतर पाकिस्तानच्या अलीने बेन स्टोक्सशी हस्तांदोलन करण्यास दिला नकार; जाणून घ्या कारण
बेन स्टोक्स आणि मोहम्मद अलीचा व्हिडिओ (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मुलतान येथे पाकिस्तान आणि इंग्लंड संघातील दुसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानवर २६ धावांनी मात केली. त्याचबरोबर तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानला ३५५ धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र पाकिस्तानचा संघ ३२८ धावांवरच गारद झाला. या सामन्यानंतर एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये पाकिस्तानचा खेळाडू मोहम्मद अलीने बेनशी हस्तांदोलन करण्यास नकार देत असल्याचे दिसत आहे.

ऑली रॉबिन्सनने मोहम्मद अलीला ऑली पोपकडे झेलबाद केले, त्यानंतर विजयावर शिक्कामोर्तब झाले होते. मात्र अलीने डीआरएसचा पर्याय निवडला. कारण, त्याला वाटले आपण कदाचित बाद झालो नसू? पण तोपर्यंत इंग्लंडच्या खेळाडूंनी सेलिब्रेशनला सुरुवात केली होती. तोपर्यंत डीआरएस घेतल्याने तिसरे पंच प्रक्रियेतून जात होते, तेव्हा स्टोक्स अलीकडे हस्तांदोलन करायला गेला.

मात्र, पाकिस्तानच्या ११व्या क्रमांकाच्या फलंदाजाने तसे करण्यास नकार दिला. त्याने स्टोक्सला काही तरी सांगितले. कदाचित त्याला आठवण करून दिली की हा निर्णय अजून मोठ्या पडद्यावर येणे बाकी होता. त्यानंतर इंग्लंडचा कर्णधार माघारी फिरला. एकदा निर्णय जाहीर झाल्यानंतर, पुन्हा हस्तांदोलन सुरू झाले.मग अलीने स्टोक्स आणि इंग्लंडला त्यांच्या विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या.

सामन्याबद्धल बोलायचे तर, सामन्याच्या चौथ्या दिवशी पाकिस्तानने दुसऱ्या डावात ४ बाद १९८ धावांरुन पुढे खेळायला सुरुवात केली. रूटने संघाला पहिला धक्का दिला. फहीम अश्रफ १० धावा करून बाद झाला. २१० धावांत ५ विकेट पडल्यानंतर सौद शकील आणि मोहम्मद नवाज यांनी संघाला सांभाळले. दोघांनी सहाव्या विकेटसाठी ८० धावा जोडून सामना रोमांचक बनवला. मात्र नवाज ४५ धावा करून वेगवान गोलंदाज मार्क वुडचा शिकार ठरला. त्याने ६२ चेंडूंचा सामना केला. ज्यामध्ये त्याने ७ चौकार लगावले.

हेही वाचा – ENG vs PAK 2nd Test: रोमांचक सामन्यात इंग्लंडचा २६ धावांनी विजय; मायदेशात पाकिस्तानने गमावली सलग दुसरी मालिका

इंग्लंडने पहिल्या डावात २८१ धावा आणि दुसऱ्या डावात २७५ धावा केल्या होत्या. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाला पहिल्या डावात केवळ २०२ धावा करता आल्या. अशाप्रकारे त्यांना ३५५ धावांचे लक्ष्य मिळाले होते. पाकिस्तानचा लेगस्पिनर अबरार अहमदने पदार्पणाच्या कसोटीत ११ विकेट घेतल्या, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. मायदेशात सलग दुसऱ्या कसोटी मालिकेत पाकिस्तानचा पराभव झाला. याआधी ऑस्ट्रेलियाने ३ सामन्यांच्या मालिकेत त्यांचा १-० असा पराभव केला होता.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-12-2022 at 16:44 IST

संबंधित बातम्या