वृत्तसंस्था, उदिने (इटली)
नियमित वेळ आणि ‘पेनल्टी शूटआउट’मध्ये दोन गोलच्या पिछाडीनंतरही दमदार पुनरागमन करताना पॅरिस सेंट-जर्मेन फुटबॉल संघाने टॉटनहॅमला पराभूत करत ‘युएफा सुपर चषका’चे जेतेपद पटकावले. फ्रेंच क्लब सेंट-जर्मेनचे हे २०२५ वर्षातील पाचवे अजिंक्यपद ठरले. नियमित वेळेतील २-२ अशा बरोबरीनंतर ‘शूटआउट’मध्ये सेंट-जर्मेनने ४-३ अशी सरशी साधली.
गतहंगामात चॅम्पियन्स लीग आणि युएफा लीग या ‘युएफा’च्या दोन सर्वोत्तम क्लब स्पर्धा जिंकणाऱ्या संघांमध्ये सुपर चषकाची लढत होते. यात युरोपा लीग विजेत्या टॉटनहॅमकडे ८५व्या मिनिटापर्यंत २-० अशी आघाडी होती. मिकी व्हॅन डे वेन (३९व्या मिनिटाला) आणि कर्णधार क्रिस्टियन रोमेरो (४८व्या मि.) या बचावपटूंनी हे गोल नोंदवले होते. मात्र, अखेरची काही मिनिटे शिल्लक असताना टॉटनहॅमचा खेळ खालावला. त्यांनी चुका करण्यास सुरुवात केली आणि याचा चॅम्पियन्स लीग विजेत्या सेंट-जर्मेनने पुरेपूर फायदा घेतला. बदली खेळाडू म्हणून मैदानावर आलेले ली कांग इन आणि गोन्सालो रामोस यांनी सामन्याचे चित्र पालटले. ली कांग इनने ८५व्या मिनिटाला सेंट-जर्मेनचा पहिला गोल केला, मग ९० मिनिटांनंतरच्या भरपाई वेळेत ओस्मान डेम्बेलेच्या पासवर रामोसने हेडरच्या सहाय्याने गोल करत सेंट-जर्मेनला बरोबरी करून दिली.
नव्या हंगामाची ही सुरुवात असल्याने या लढतीत नियमित वेळेतील बरोबरीनंतर ३० मिनिटांच्या अतिरिक्त वेळेऐवजी थेट ‘पेनल्टी शूटआउट’चा अवलंब करण्यात आला. यात सेंट-जर्मेनकडून पहिली किक घेणारा व्हिटिनिया चुकला. तर डॉमिनिक सोलंकी आणि रॉड्रिगो बेंटाकुर यांनी गोल करत टॉटनहॅमला २-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, याही वेळा आघाडी टिकवण्यात टॉटनहॅमचा संघ अपयशी ठरला. सेंट-जर्मेनकडून रामोस, डेम्बेले, कांग इन आणि नुनो मेंडेस यांनी चेंडूला गोलजाळीची अचूक दिशा दिली. टॉटनहॅमकडून व्हॅन डे वेन आणि माथिस टेल यांना अपयश आले. त्यामुळे पेड्रो पोरोच्या यशस्वी किकनंतरही टॉटनहॅमला हार पत्करावी लागली.
पेनल्टी शूटआउट
टॉटनहॅम सेंटजर्मेन
डॉमिनिक सोलंकी ● (१०) व्हिटिनिया x
रॉड्रिगो बेंटाकुर ● (२१) गोन्सालो रामोस ●
मिकी व्हॅन डे वेन x (२२) ओस्मान डेम्बेले ●
माथिस टेल x (२३) ली कांग इन ●
पेड्रो पोरो ● (३४) नुनो मेंडेस ●
फुटबॉल काही वेळा अन्यायकारक ठरू शकतो. टॉटनहॅमने संपूर्ण सामन्यात आमच्यापेक्षा चांगला खेळ केला. अखेरच्या १० मिनिटांत दोन गोल करून नंतर शूटआउटमध्ये आम्ही विजय मिळवला. त्यामुळे आम्ही नशीबवान ठरलो असे म्हणायला हरकत नाही. – लुइस एनरिके, प्रशिक्षक, पॅरिस सेंट-जर्मेन.