जिम्नॅस्टिक हा खेळ मुंबईत नावारूपाला आणण्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारी संस्था म्हणजे पवनपुत्र व्यायाम मंदिर. शुक्रवारी ही संस्था आपला सुवर्णमहोत्सव साजरा करते आहे, पण पन्नाशी पूर्ण करणाऱ्या पवनपुत्रला अस्तित्वासाठी झुंजावे लागत आहे. ही जागा पाठारे कुटुंबियांच्या मालकीची असली तरी पुनर्विकासामध्ये पवनपुत्र व्यायाम मंदिर बेघर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
१४ नोव्हेंबर १९६३ साली स्वातंत्र्यसैनिक स्वर्गीय रामनाथ पाठारे यांनी पवनपुत्र व्यायाम मंदिराची स्थापना केली. सुरुवातीला ४०-४५ फूट जागेमध्ये २-३ गाद्यांवर मल्लखांब आणि जिम्नॅस्टिकला सुरुवात करण्यात आली. १९६७ साली त्यांचा मुलगा सुहास पाठारे यांनी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. १९७६ साली व्यायामशाळेने राष्ट्रीय स्पर्धेत पहिले पदक कमावले. १९८२ साली व्यायाम मंदिराचे महेंद्र चेंबूरकर आणि मंजुश्री चिवटे हे आशियाई स्पर्धेत खेळले होते. १९९२मध्ये संस्थेच्या सजीवन भास्करन यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये विक्रमाला गवसणी घातली होती. नुकत्याच झालेल्या इन्चॉन येथील आशियाई स्पर्धेमध्ये मंदार म्हात्रे यांनी पंचांची भूमिका वठवली होती. आतापर्यंत व्यायाम मंदिराच्या १६ खेळाडूंना छत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बदलत्या प्रवाहाप्रमाणे व्यायाम मंदिराने तालबद्ध आणि कलात्मक जिम्नॅस्टिकचे प्रशिक्षण दिले जाते, त्याचबरोबर वेटलिफ्टिंग आणि पॉवरलिफ्टिंग खेळाचेही प्रशिक्षण दिले जाते. सध्याच्या घडीला २०० खेळाडू व्यायाम मंदिरामध्ये खेळत असून यापैकी १०० खेळाडू जिम्नॅस्टिकचे प्रशिक्षण घेत आहेत.
पवनपुत्रचे वास्तव मांडताना संस्थेचे संस्थापक सुहास पाठारे म्हणाले, ‘‘आतापर्यंत व्यायाम मंदिराने चांगले-वाईट पाहिले. बऱ्याच खेळाडूंनी संस्थेचे नाव मोठे केले आहे आणि यापुढेही करत राहतील. संस्थेची आर्थिक स्थिती चांगली नाही. माजी खेळाडूंचा आर्थिक हातभार लागत असला तरी तो पुरेसा नाही. त्याचबरोबर व्यायाम मंदिर हे पाठारे कुटुंबियांच्या जागेवर असून आता विकासक पुनर्विकासासाठी काम करायला सुरुवात करणार आहे. पुनर्विकासामध्ये व्यायाम मंदिराला जागा मिळणार का, याबाबतीत साशंका आहे. त्यामुळे सुवर्णमहोत्सव पूर्ण करत असताना आम्हाला अस्तित्वासाठी झुंज द्यावी लागत आहे.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘खेळाचा प्रसार व्हावा, हेच आमचे ध्येय आहे. व्यायाम मंदिरासाठी जागा मिळाली नाही, तर शाळांमध्ये जाऊन प्रशिक्षण देण्याचा आमचा मानस आहे. खेळासाठी सर्वस्व पणाला लावलेले असले तरी प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळत नाही. जर आम्हाला मदत मिळाली तर खेळाचा प्रसार मोठय़ा प्रमाणात करता येईल.’’