साण्टोस (ब्राझील) : सर्वकालीन सर्वोत्तम फुटबॉलपटू पेलेंच्या पार्थिवावर मंगळवारी असंख्य चाहत्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्या शहराला पेलेंनी जगात ओळख दिली, त्याच साण्टोस शहरातील दफनभूमीत पेले यांचे पार्थिव दफन करण्यात आले.पेले आपल्या कारकीर्दीत बहुतेक सामने याच मैदानावर खेळले. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी या स्थानाची निवड करण्यात आली. कर्करोगाच्या आजाराने वयाच्या ८२व्या वर्षी गेल्या आठवडय़ात पेलेंचे निधन झाले. वयाच्या १५व्या वर्षी पेले साण्टोस एफसी संघाकडून खेळण्यासाठी या शहरात आले आणि या शहराशी एकरूप होऊन गेले.

पेलेंचे पार्थिव बेल्मिरो मैदानावरून काळय़ा शवपेटीतून अग्निशामक दलाच्या गाडीतून दफनभूमीकडे नेण्यात आले. या वेळी बॅण्डवर ब्राझील संघाचे अधिकृत गाणे आणि रोमन कॅथोलिक गाण्याची धून वाजवण्यात आली. त्याच वेळी संगीताची जाण आणि आवड असणाऱ्या लाडक्या खेळाडूला निरोप देण्यासाठी उपस्थित चाहते अखेपर्यंत सांबा गीत गात होते.

मैदानात असलेल्या एका गोलपोस्टजवळ पेलेंची १० क्रमांकाची जर्सी ठेवण्यात आली होती. मैदानाचा एक भाग अंत्यसंस्कारासाठी आलेल्या चाहत्यांनी सोबत आणलेल्या फुलांनी भरून गेला होता. यामध्ये नेयमार आणि रोनाल्डो यांनी पाठवलेल्या फुलांचाही समावेश होता.‘फिफा’चे अध्यक्ष जियानी इन्फॅन्टिनोदेखील अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते. पेलेंनी फुटबॉलला संजीवनी दिली आणि फुटबॉल त्यांचे जीवन होते. जगभरात पेलेंनी फुटबॉलला लोकप्रियता मिळवून दिली. ज्याचा आजची पिढी लाभ घेत आहे, अशी प्रतिक्रिया इन्फॅन्टिनोंनी व्यक्त केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.