भारताची तडाखेबाज फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज सध्या इंग्लंडमध्ये आहे. ती सध्या द हण्ड्रेड या स्पर्धेतील महिलांसाठी आयोजित करण्यात आलेली पहिलीच मालिका खेळत आहे. ती या स्पर्धेत नॉर्दन सुपरचार्जर्सच्या संघाकडून खेळत असून तिच्या फलंदाजीमुळे चर्चेत आहे. तिने आतापर्यंत या मालिकेत सहा सामने खेळले असून सध्या या १०० चेंडूंच्या स्पर्धेमध्ये ती सर्वाधिक धावा करणारी महिला खेळाडू आहे. तिने ४९.६० च्या सरासरीने आतापर्यंत सहा सामन्यात २४८ धावा केल्यात. पॉइण्ट्स टेबलमध्ये तिचा संघ तिसऱ्या स्थानी असून त्यांनी सातपैकी तीन सामने जिंकलेत.

मैदनातील कामगिरीबरोबरच मैदानाबाहेरही जेमिमा ही कायम चर्चेत असते. नुकतीच ती स्काय स्पोर्ट्सवर एका सामन्याचं समालोचन करत होती. यादरम्यान जेमिम्माला उत्तम फलंदाजी करणारा तुझा आवडता यष्टीरक्षक कोण?, असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला जेमिमाने दिलेलं उत्तर हे सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

मूळची मुंबईकर असणाऱ्या जेमिमाने आधी अ‍ॅडम गिलक्रीस्टचं नाव तिचा आवडता यष्टीरक्षक फलंदाज म्हणून घेतलं. मात्र नंतर लगेच तिने आपलं उत्तर बदललं आणि एम. एस. धोनीचं नाव घेतलं. पुढे ती मस्करीमध्ये, “मी धोनीचं नाव विसरले तर भारतीय चाहते मला मारुन टाकतील” असं वक्तव्यही केलं. “मला वाटतं गिलक्रीस्ट… ओह सॉरी… आणि धोनी… त्याचं नाव नाही घेतलं तर भारतातील चाहते मला मारुन टाकतील,” असं ती उत्तर देताना म्हणाली. जेमिमाच्या या उत्तरानंतर तिच्यासोबत समालोचन करणारा सहकारी मोठ्याने हसताना दिसतो. फॅन कोडच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन या मजेदार उत्तराचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

“तुम्हाला वाटतंय का जेजिमा रॉडिग्ज ही एम. एस. धोनीची फॅन आहे? तिचा आवडता विकेटकीपर बॅट्समन कोण आहे जाणून घ्या,” अशा कॅप्शनसहीत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.

द हण्ड्रेडमध्ये दमदार कामगिरी करण्याआधी धाव होत नसताना होणारी टीका कशी हाताळली यासंदर्भातही या मुलाखतीमध्ये जेमिमाने भाष्य केलं आहे. “टीका हातळण्याचा माझ्या दृष्टीने सर्वोत्तम उपाय म्हणजे त्याकडे दूर्लक्ष करा. तुम्ही तुमची सर्वोत्तम कामगिरी करुन त्यासाठी मेहनत घेत असता तेव्हा कोणालाच ठाऊक नसतं की तुम्ही कोणत्या परिस्थितीमधून जात आहात. अगदी रडणं, हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना या साऱ्यातून तुम्ही शिकून पुढे आलेले असता म्हणून मी ऑनलाइनही काही वाचत नाही ज्यामुळे माझा उत्साह कमी होईल,” असं जेमिमा म्हणाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या खेळावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचंही जेमिमाने सांगितलं.