सिडनी : भारतीय संघाविरुद्धच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी तेथील खेळपट्टय़ांवर सराव सामने खेळणे निरूपयोगी आहे. त्यापेक्षा नेटमधील सराव खूप फायद्याचा ठरतो, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथने व्यक्त केले.

भारतात सराव सामन्यांसाठी गवत असलेल्या खेळपट्टी देतात आणि प्रत्यक्ष सामना मात्र फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर होतो, असे कारण पुढे करत ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी सराव सामने खेळण्यास नकार दिला आहे.

स्मिथची ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून चौथ्यांदा निवड झाली. भारत दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने भारत दौऱ्याविषयी आपली मते स्पष्टपणे मांडली. सहसा इंग्लंडविरुद्ध जेव्हा मालिका असते, तेव्हा आम्ही किमान दोन सराव सामने खेळतो. पण, या वेळी आम्ही भारतात एकही सराव सामना खेळणार नाही, असे स्मिथ म्हणाला. भारतात दाखल झाल्यावर पहिल्या कसोटीपूर्वी बंगळूरु येथे ऑस्ट्रेलियन संघाचा एक आठवडा मुक्काम असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी भारताच्या अखेरच्या दौऱ्यात आम्हाला सरावासाठी हिरवळ असलेल्या खेळपट्टय़ा देण्यात आल्या होत्या. मात्र, सामने फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर खेळवण्यात आले. या वेळी आम्ही सामने खेळणार नाही, पण सरावासाठी तरी दर्जेदार सुविधा उपलब्ध होतील, अशी  आशा  स्मिथने व्यक्त केली.