भारतीय संघ आतापर्यंतचा पहिला-वहिला थॉमस चषक जिंकून इतिहास रचला. ऐतिहासिक थॉमस चषक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाचे अभिनंदन केलं. भारतीय शटलर चिराग शेट्टीने आनंद व्यक्त करत या भावनिक क्षणाबद्दल पंतप्रधान मोदींचे आभारही मानले. चिराग शेट्टी सांगितलं की, “मी कधीही पंतप्रधानांना विजयानंतर क्रीडा संघाशी बोलताना पाहिले नाही. हे फक्त भारतातच घडते आणि त्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळाली. पंतप्रधानांनी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढला आणि आम्हाला विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या, याचा आम्हाला खूप आनंद झाला.”

“आम्हाला खरोखरच खूप आनंद वाटत आहे. आम्ही ज्या प्रकारे खेळलो, मला वाटते की हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदी दिवसांपैकी एक आहे. हा एका परीकथेसारखा दिवस आहे. कारण थॉमस कप अंतिम फेरीत इंडोनेशियाला ३-० ने पराभूत केले.” असंही चिराग शेट्टी याने पुढे सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बँकॉकहून परतल्यावर खेळाडूंना त्यांच्या निवासस्थानी येण्याचे निमंत्रण दिले आहे. यावेळी पंतप्रधानांनी खेळाडूंच्या पालकांचे आभार मानले आणि त्यांच्या विजयामुळे अनेक नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळेल असे सांगितले.

थॉमस कप २०२२ च्या अंतिम फेरीत भारतीय बॅडमिंटन संघाने इतिहास रचला. भारताने रविवारी सलग तिसऱ्या सामन्यात गतविजेत्या इंडोनेशियाचा पराभव करून थॉमस कप २०२२ चे विजेतेपद पटकावले. भारताने पहिले तीन सामने जिंकून १४ वेळच्या चॅम्पियन इंडोनेशियाचा एकतर्फी ३-० असा पराभव केला. भारतासाठी, लक्ष्य सेनने पुरुष एकेरीत, सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टीने पुरुष दुहेरीमध्ये आणि किदाम्बी श्रीकांतने पुरुष एकेरी गटात आपापले सामने जिंकले. यासह भारताने प्रथमच थॉमस कप जेतेपद पटकावले आहे.