भारताविरुद्ध टी-२० आणि कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बांगलादेशचा संघ भारतात दाखल झाला आहे. ३ नोव्हेंबरपासून बांगलादेशच्या भारत दौऱ्याला सुरुवात होणार असून दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर पहिला टी-२० सामना रंगणार आहे. मात्र गेले काही दिवस दिल्लीमधील वाढतं प्रदुषण आणि हवेची खालावलेली पातळी पाहता, हा सामना दिल्लीबाहेर हलवण्याची मागणी काही पर्यावरणवादी आणि माजी खेळाडूंनी केली आहे. भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरनेही दिल्लीतल्या या समस्येबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

“दिल्लीत एक क्रिकेटचा सामना व्हावा की नाही यापेक्षाही प्रदूषण ही मोठी समस्या आहे. दिल्लीतल्या लोकांनीही क्रिकेटच्या सामन्यापेक्षा हवेची खालावलेली पातळी आणि वाढतं प्रदूषण याविषयी चिंता करायला हवी.” ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत गौतम गंभीर बोलत होता. भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनिल छेत्रीनेही याविषयी चिंता व्यक्त केली आहे.

  • दिल्लीतला सामना नियोजित वेळापत्रकानुसारच !

दरम्यान एकीकडे दिल्लीतला पहिला टी-२० सामना दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची मागणी होत असली तरीही दिल्ली क्रिकेट असोसिएशनने सामना वेळापत्रकानुसारच होणार असल्याचं स्पष्ट केलंय. बीसीसीआयने आतापर्यंत आमच्याकडे सामन्याचं स्थळ हटवण्यासंदर्भात कसलीही माहिती दिली नसल्याचं दिल्ली क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.