श्रीलंकेविरुद्ध मायदेशात होणाऱ्या मालिकेसाठी भारताच्या कसोटी क्रिकेट संघाचेही कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवले जाण्याची दाट शक्यता आहे. मोहालीत १००वा कसोटी सामना खेळण्यासाठी अनुभवी फलंदाज विराट कोहली ट्वेन्टी-२० मालिकेतून विश्रांती घेऊ शकेल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील वरिष्ठ राष्ट्रीय निवड समिती येत्या काही दिवसांत श्रीलंकेविरुद्धच्या मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा करणार आहे. वॉशिंग्टन सुंदर आणि केएल राहुल ट्वेन्टी-२० मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमीचे संघात पुनरागमन निश्चित मानले जात आहे. शुभमन गिलला निवडीसाठी उपलब्ध होण्याआधी तंदुरुस्तीचा अडथळा ओलांडावा लागणार आहे. राहुल आणि शुभमनच्या अनुपस्थितीत मयांक अगरवाल डावाला सुरुवात करू शकेल. हनुमा विहारी आणि श्रेयस अय्यर मधल्या फळीतील स्थानांसाठी उत्तम पर्याय ठरतील. मुंबईकर सर्फराज खानने द्विशतकासह आणखी एक पर्याय उपलब्ध केला आहे.




जडेजाचे पुनरागमन निश्चित
दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकांमध्ये खेळू न शकलेला अष्टपैलू रवींद्र जडेजा दुखापतीतून सावरला असून, तो निवडीसाठी उपलब्ध आहे. रवीचंद्रन अश्विन, जडेजा आणि जयंत यादव या त्रिकुटावर फिरकीची मदार असेल.
वरिष्ठ खेळाडूंचा प्रश्न ऐरणीवर
यष्टीरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहा, वेगवान गोलंदाज इशांत शर्मा, फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या अनुभवी खेळाडूंच्या निवडीचा प्रश्न ऐरणीवर असेल. रहाणेने रणजी स्पर्धेतील शतकानिशी आपली दावेदारी मजबूत केली आहे. पुजाराची फलंदाजी अद्याप बाकी आहे. मात्र ३८ वर्षीय साहा आणि ३३ वर्षीय इशांत यांच्याऐवजी नव्या पर्यायांचा गांभीर्याने विचार होऊ शकतो.