नवी दिल्ली : भारताचा युवा बुद्धिबळपटू प्रज्ञानंदने विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनवर वर्षभरात दुसऱ्यांदा विजय मिळवण्याचा पराक्रम दाखवला आहे. प्रज्ञानंदने चेसेबल मास्टर्स ऑनलाइन जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीत कार्लसनला नामोहरम केले. तीन महिन्यांपूर्वी प्रज्ञानंदने कालर्सनला प्रथमच हरवून सर्वाचे लक्ष वेधले होते.

शुक्रवारी झालेल्या सामन्याच्या उत्तरार्धात नॉर्वेच्या कार्लसनकडून झालेल्या चुकीचा फायदा घेत चेन्नईच्या १६ वर्षीय प्रज्ञानंदने विजयाचे तीन गुण खिशात घालत बाद फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. ‘‘मला अशा प्रकारे सामना जिंकायचा नव्हता,’’ अशी प्रतिक्रिया प्रज्ञानंदने व्यक्त केली. पाचव्या फेरीचा सामना बरोबरीच्या दिशेने वाटचाल करीत असताना ४०व्या चालीला काळय़ा मोहऱ्यांनिशी खेळणाऱ्या कार्लसनने रचलेली घोडय़ाची चाल चुकली. त्यामुळे पुढच्याच चालीला प्रज्ञानंदला हा सामना जिंकता आला.

मग सहाव्या फेरीत प्रज्ञानंदने भारताच्याच पेंटाला हरिकृष्णशी बरोबरी साधली. सातव्या फेरीत प्रज्ञानंदने गॅवेन जोन्सला हरवले, तर आठव्या फेरीत डेव्हिड अँटन गुइजारोकडून त्याने पराभव पत्करला. आठव्या फेरीअखेरीस प्रज्ञानंदचे १२ गुण झाले असून, तो डिंग लिरेनसह संयुक्तपणे पाचव्या स्थानावर आहे. चीनचा वेई यि याने एकटय़ाने आघाडी घेतली असून कार्लसन दुसऱ्या स्थानावर आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फेब्रुवारीत झालेल्या एअरिथग्ज मास्टर्स ऑनलाइन जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या आठव्या फेरीत प्रज्ञानंदने कार्लसनला हरवून बुद्धिबळ जगताला धक्का दिला होता. कार्लसनला हरवणारा प्रज्ञानंद हा भारताचा तिसरा बुद्धिबळपटू ठरला होता.