अन्वय सावंत

मुंबई : २०२२ मध्ये मायदेशात झालेल्या ऑलिम्पियाड स्पर्धेतील दर्जेदार कामगिरीनंतर भारतीय बुद्धिबळपटूंचा आत्मविश्वास वाढला. त्यानंतर भारतीय खेळाडूंनी स्पर्धेगणिक कामगिरी उंचावत जागतिक बुद्धिबळात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. आता एप्रिलमध्ये होणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेसाठी पाच भारतीय बुद्धिबळपटूंनी पात्रता मिळवली आहे. त्यामुळे भारतीय बुद्धिबळाच्या अफाट क्षमतेवर मोहोर उमटली आहे, असे मत ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू प्रवीण ठिपसे यांनी व्यक्त केले.

टोरंटो, कॅनडा येथे २ ते ५ एप्रिल २०२४ या कालावधीत ‘कॅन्डिडेट्स’ म्हणजेच आव्हानवीरांची स्पर्धा होणार आहे. पुरुष विभागात आर. प्रज्ञानंद, विदित गुजराथी आणि डी. गुकेश, तर महिलांमध्ये आर. वैशाली आणि कोनेरू हम्पी हे भारतीय ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. दोन्ही विभागांमध्ये प्रत्येकी आठ बुद्धिबळपटूंचा समावेश असेल. यापैकी विजेत्यांना जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत जगज्जेत्यांना आव्हान देण्याची संधी मिळेल.

हेही वाचा >>>AUS vs PAK 3rd Test: तिसऱ्या कसोटीआधी पाकिस्तानला मोठा धक्का! ‘हा’ डावखुरा फलंदाज दुखापतीमुळे होऊ शकतो बाहेर

‘कॅन्डिडेट्स’सारख्या स्पर्धेत पुरुष विभागात आठपैकी तीन आणि महिलांमध्ये आठपैकी दोन भारतीय बुद्धिबळपटूंचा समावेश असणे हे खूप मोठे यश असल्याचे ठिपसे यांना वाटते. पूर्वी या स्पर्धेत सोव्हिएत संघाचे वर्चस्व असायचे. तसेच काहीसे चित्र आता भारताच्या बाजूने निर्माण झाले आहे, असे ठिपसे म्हणाले.

‘‘भारतीय बुद्धिबळ गेल्या काही वर्षांपासून प्रगतिपथावर आहे. भारताच्या या वाटचालीत २०२२मध्ये मायदेशात झालेली ऑलिम्पियाड स्पर्धा अत्यंत महत्त्वाची ठरली. ऑलिम्पियाडमध्ये गुकेश, प्रज्ञानंद यांसारख्या युवा खेळाडूंचा समावेश असलेल्या भारताच्या ‘ब’ संघाने कांस्यपदकाची कमाई केली होती. या स्पर्धेत पहिल्या पटावर गुकेश सुवर्णपदकाचा मानकरी ठरला होता. निहाल सरीननेही चमक दाखवली होती. या यशानंतर भारतीय बुद्धिबळपटूंचा आत्मविश्वास वाढला. आपण आघाडीच्या बुद्धिबळपटूंना टक्कर देऊ शकतो आणि पुढे जाऊन त्यांना पराभूतही करू शकतो याची त्यांना जाणीव झाली. त्यानंतर गुकेशने क्रमवारीत विश्वनाथन आनंदलाही मागे टाकले, तर प्रज्ञानंद विश्वचषक स्पर्धेत जेतेपदाच्या अगदी जवळ पोहोचला होता. विदित आणि वैशाली यांनी ग्रँड स्वीस स्पर्धा जिंकण्याची किमया साधली. हम्पीने सातत्यपूर्ण कामगिरी सुरू ठेवत क्रमवारीच्या आधारे ‘कॅन्डिडेट्स’साठी पात्रता मिळवली. त्यामुळे भारतीय बुद्धिबळाची क्षमता अधोरेखित झाली आहे,’’ असे ठिपसे यांनी नमूद केले.

हेही वाचा >>>IND vs SA 2nd Test : भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जडेजा-अश्विनमध्ये कोणाला मिळावे स्थान? इरफान पठाणने दिले उत्तर

गुकेशने सातत्य राखणे गरजेचे

’ गुकेश, विदित, प्रज्ञानंद हे तीन भारतीय ‘कॅन्डिडेट्स’साठी पात्र ठरले असले, तरी त्यांना जेतेपद मिळवणे अवघड जाईल. यात अनुभवाच्या जोरावर विदित सर्वोत्तम कामगिरी करू शकेल.

’ गुकेश आता क्रमवारीनुसार भारताचा अव्वल बुद्धिबळपटू आहे. त्याच्यातील प्रतिभा पाहता, तो खूप मोठी मजल मारू शकतो. मात्र, त्यासाठी सातत्य अत्यंत महत्त्वाचे आहे.

’ प्रज्ञानंदची शैली सर्वात निराळी आहे. तो निडरपणे खेळतो, आक्रमक चाली रचतो. प्रतिस्पर्धी वरचढ ठरत असला, तरी तो शेवटपर्यंत झुंज देत राहतो. त्याच्यासारखा दुसरा बुद्धिबळपटू भारतात नाही.

प्रायोजकांचा ओघ वाढेल

कार्लसन आणि आनंद यांसारखे दिग्गज बुद्धिबळपटू वयाच्या २१व्या वर्षी ‘कॅन्डिडेट्स’साठी पात्र ठरले होते. आता ‘कॅन्डिडेट्स’मध्ये स्थान मिळवणारा प्रज्ञानंद केवळ १८ वर्षांचा आहे, तर गुकेशचे वय त्याहूनही कमी आहे. त्यांचे हे यश उल्लेखनीय आहे. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत भारतीय बुद्धिबळाचा पूर्णपणे कायापालट झालेला आहे असे म्हणणे वावगे ठरू नये. या यशामुळे आता प्रायोजक आणि आघाडीचे परदेशी प्रशिक्षक भारतात येण्याचा ओघ वाढेल. तसेच अनेक युवक बुद्धिबळात कारकीर्द घडवण्याचा विचार करू शकतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘कॅन्डिडेट्स’सारख्या स्पर्धेत पुरुष विभागात आठपैकी तीन आणि महिलांमध्ये आठपैकी दोन भारतीय बुद्धिबळपटूंचा समावेश असणे हे खूप मोठे यश आहे. त्यामुळे भारतीय बुद्धिबळाच्या अफाट क्षमतेवर मोहोर उमटली आहे असल्याचे ठिपसे यांना वाटते.