वृत्तसंस्था, मँचेस्टर

मँचेस्टर सिटीने दुबळय़ा ल्युटनवर ५-१ असा दमदार विजय मिळवताना इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉलच्या जेतेपदासाठीची चुरस कायम राखली आहे. सिटीचे आता ३२ सामन्यांत ७३ गुण झाले आहेत. त्यांना लिव्हरपूल आणि आर्सेनलकडून आव्हान मिळते आहे.

ल्युटनचा बचावपटू दायकी हाशिओकाकडून झालेल्या स्वयंगोलमुळे सिटीला दुसऱ्याच मिनिटाला आघाडी मिळाली. यानंतर ल्युटनने पूर्वार्धात सिटीला केवळ एका गोलवर रोखले होते. मात्र, उत्तरार्धात सिटीने गोलच्या मिळालेल्या संधी सत्कारणी लावताना मोठा विजय मिळवला. त्यांच्यासाठी माटेओ कोवाचिच (६४व्या मिनिटाला), अर्लिग हालँड (७६व्या मि.), जेरेमी डोकू (८७व्या मि.) आणि जोस्को ग्वार्डियोल यांनी गोल केले. ग्वार्डियोलने आपला गोल ९० मिनिटांनंतरच्या भरपाई वेळेत केला. ल्युटनचा एकमेव गोल रॉस बार्कलीने ८१व्या मिनिटाला केला होता.

हेही वाचा >>>IPL 2024: रोहितची शतकी खेळी व्यर्थ; पथिरानाच्या गोलंदाजीमुळे चेन्नईचा मुंबईवर दणदणीत विजय

अन्य लढतीत, न्यूकॅसलने टॉटनहॅमला पराभवाचा धक्का दिला. न्यूकॅसलने हा सामना ४-० असा मोठय़ा फरकाने जिंकला. न्यूकॅसलसाठी आघाडीपटू अलेक्झांडर इसाकने (३० व ५१व्या मि.) दोन, तर अ‍ॅन्थनी गॉर्डन (३२व्या मि.) आणि फॅबियन शेर (८७व्या मि.) यांनी एकेक गोल केला. मँचेस्टर युनायटेडला बोर्नमथने २-२ असे बरोबरीत रोखले.