परस्पर हितसंबंध जोपासल्याप्रकरणी लवाद अधिकारी डी. के. जैन यांनी माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांची सुनावणी घेतल्यास, त्यावेळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राहुल जोहरी आणि संपूर्ण कायदेशीर सल्लागार पथक उपस्थित राहणार आहे.
सचिन आणि लक्ष्मण यांनी परस्पर हितसंबंधांच्या आक्षेपाबाबतची त्यांची भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली आहे. आयपीएलमधील मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद या दोन्ही संघांचे मार्गदर्शक तसेच क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य अशा दुहेरी भूमिकेत त्यांचे परस्पर हितसंबंध जोपासले जात असल्याबाबतचा आक्षेप त्यांनी फेटाळला आहे.
‘‘सौरव गांगुलीच्या प्रकरणात जशी लवाद अधिकाऱ्यांसमोर सुनावणी झाली, त्यावेळी जसे बीसीसीआयचे सीईओ उपस्थित होते, तसेच तेंडुलकर आणि लक्ष्मणची सुनावणी झाल्यास सीईओ आणि संपूर्ण कायदेशीर सल्लागार पथक तिथे उपस्थित असेल’’ असे बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीच्या एका सदस्याने सांगितले. त्यामुळे बीसीसीआयच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नसल्याचेही नमूद करण्यात आले.