ज्ञानेश भुरे

पुणे : प्रो कबड्डीच्या नवव्या मोसमातील दुसऱ्या आणि पुणे टप्प्यातील अखेरच्या दिवशी यूपी योद्धाज संघाने आक्रमक खेळ करताना दबंग दिल्लीचा ५०-३१ असा पराभव केला. पहिल्या सामन्यात पाटणा पायरेट्स आणि तमिळ थलायवाजचा सामना ३३-३३ असा बरोबरीत सुटला.

म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॅडिमटन हॉलमध्ये झालेल्या या पर्वातील अखेरच्या सामन्यात पुणेकरांना प्रदीप नरवालच्या तुफानी चढायांचा आनंद घेता आला. प्रदीपच्या आक्रमक चढायांनी युपी संघाला सुरुवातीपासून इतके पुढे ठेवले की दिल्ली संघाची त्यांना गाठताना पुरती दमछाक झाली. मध्यंतरालाच २९-१४ अशी आघाडी घेत यूपी संघाने आपले वर्चस्व सिद्ध केले होते. पूर्वार्धात दोन आणि उत्तरार्धात एक असे तीन लोण देत यूपी संघाने दिल्ली संघाला सामन्यात परतण्याची संधीच दिली नाही. दिल्ली संघाला नवीन कुमार आणि आशु याप्रमुख खेळाडूंना आलेले अपयश चांगलेच महागात पडले. पुणे टप्प्यात दिल्ली संघाला केवळ एकच विजय मिळवता आला. यूपी योद्धाज संघाने विजय मिळवून ४५ गुणांसह चौथ्या स्थानापर्यंत झेप घेतली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यापूर्वी झालेल्या पहिल्या सामन्यात पाटणा पायरेट्सला मध्यंतराला मिळविलेल्या २०-१४ आघाडीचा फायदा उठवता आला नाही. उत्तरार्धात तमिळ थलायवाजच्या खेळाडूंनी आपला खेळ उंचावताना पाटणासमोर एकवेळेस आव्हान उभे केले होते. नरेंदर आणि अजिंक्य पवार यांनी यामध्ये प्रमुख भूमिका बजावली. त्यामुळे तमिळला हरलेला सामना अखेरीस बरोबरीत रोखण्यात यश आले. पाटणा संघाकडून सचिन तवरच्या चढायांना रोहित गुलियाच्या अष्टपैलू खेळाची साथ मिळाली. मात्र, त्यांना प्रतिकाराचे विजयात रूपांतर करण्यात अपयश आले.