Pro Kabaddi Season 6 :यूपीचे चक्रव्यूह भेदण्याचे सिद्धार्थपुढे आव्हान

सिद्धार्थ देसाईच्या चतुरस्र चढाया हे प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या हंगामात यू मुंबाच्या यशाचे सूत्र ठरले आहे.

सिद्धार्थ देसाई

प्रो कबड्डी लीग

यूपी योद्धाविरुद्ध यू मुंबाचे पारडे जड; बंगालचा सामना दिल्लीशी

सिद्धार्थ देसाईच्या चतुरस्र चढाया हे प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या हंगामात यू मुंबाच्या यशाचे सूत्र ठरले आहे. २० सामन्यांत चढायांचे २११ गुण मिळवणाऱ्या सिद्धार्थने १२ वेळा १०हून अधिक गुणांचा टप्पा ओलांडून सर्वाचे लक्ष वेधले आहे. त्यामुळेच रविवारी कोची येथील राजीव गांधी बंदिस्त स्टेडियमवर होणाऱ्या ‘एलिमिनेटर-१’ सामन्यात प्रतिस्पर्धी यूपी योद्धा संघाने त्याला जेरबंद करण्यासाठी खास रणनीती आखली आहे. परंतु हे चक्रव्यूह भेदण्यासाठी सिद्धार्थ सज्ज झाला आहे. याचप्रमाणे ‘एलिमिनेटर-२’ सामना बंगाल वॉरियर्स विरुद्ध दबंग दिल्ली यांच्यात रंगणार आहे.

यू मुंबा आणि यूपी योद्धा यांच्यात आतापर्यंत झालेल्या तीन लढतींपैकी दोन यू मुंबाने जिंकल्या आहेत, तर एक यूपीने जिंकली आहे. याशिवाय यू मुंबाने साखळीत १५ विजय मिळवले आहेत, तर यूपीने फक्त ८ सामने जिंकले आहेत. त्यामुळेच या सामन्यात यू मुंबाचे पारडे जड मानले जात आहे. मात्र सिद्धार्थ विरुद्ध रिशांक देवाडिगा ही महाराष्ट्राच्या चढाईपटूंमधील जुगलबंदी रंगतदार ठरू शकेल. याचप्रमाणे फझल अत्राचाली विरुद्ध नितेश कुमार यांच्यामध्ये पोलादी पकडींवर अनुक्रमे यू मुंबा आणि यूपीची मदार आहे.

पाच संरक्षक आणि दोन चढाईपटू हे सूत्र यू मुंबाने जपले आहे. फझल, सुरेंदर सिंग, धरमराज चेरलाथन, विनोद कुमार आणि रोहित राणा यांच्यावर यू मुंबाच्या पकडींची भिस्त आहे, तर सिद्धार्थला तोलामोलाची साथ रोहित बलियान, विनोद, दर्शन कडियान आणि अबूल फझल मॅघसोडलोऊ यांची मिळते. यूपी योद्धाचे आक्रमण श्रीकांत जाधव आणि प्रशांत कुमार राय यांच्यामुळे धारदार ठरू शकेल.

बंगाल वॉरियर्स आणि दबंग दिल्ली यांनी साखळीत अनुक्रमे १२ आणि ११ विजय संपादन केले आहेत. या दोन संघांमध्ये आतापर्यंत झालेल्या ११ सामन्यांपैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी पाच लढती जिंकल्या आहेत, तर एक लढत बरोबरीत सुटली आहे. त्यामुळेच हा सामना रंगतदार होईल अशी अपेक्षा आहे. बंगालच्या चढायांची धुरा मणिंदर सिंग आणि यांग कुन ली सांभाळतील, तर बचावाची जबाबदारी रण सिंग आणि सूरजित सिंग यांच्यावर असेल. दिल्लीची प्रमुख मदार अष्टपैलू मेराज शेखवर असेल. याशिवाय नवीन कुमार आणि चंद्रन रंजित हे हरहुन्नरी युवा खेळाडू चढायांची, तर रवींदर पहेल, जोगिंदर नरवाल आणि विशाल माने बचाव फळी सांभाळतील.

यू मुंबाचे आक्रमण आणि बचाव हे दोन्ही उत्तम आहेत. त्यामुळे यूपी योद्धाला हरवून आम्ही अंतिम फेरीपासून एका सामन्याच्या अंतरावर पोहोचू शकू.

– फझल अत्राचाली,  यू मुंबाचा कर्णधार

फझल अत्राचाली, सुरेंदर सिंग आणि धरमराज चेरलाथन यांचा भक्कम बचाव भेदण्यासाठी आम्हाला चढायांमध्ये अधिक लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. याशिवाय सिद्धार्थ देसाईच्या पकडी करण्यासाठी आम्ही योग्य रणनीती आखली आहे.

-रिशांक देवाडिगा, यूपी योद्धाचा कर्णधार

आजचे सामने

यू मुंबा वि. यूपी योद्धा

सामन्याची वेळ : रात्री ८ वा.

बंगाल वॉरियर्स वि. दबंग दिल्ली

सामन्याची वेळ : रात्री ९ वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व pro kabaddi league बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Challenge the siddhartha to divide the maze of the up

ताज्या बातम्या