प्रो-कबड्डीच्या सहाव्या पर्वात गतविजेत्या पाटणा पायरेट्सने आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली आहे. पाटण्याने उत्तर प्रदेश योद्धाजची झुंज 43-41 अशी मोडून काढली. पाटण्याकडून कर्णधार प्रदीप नरवालने चढाईत 16 गुणांची कमाई करत संघाच्या विजयात मोलाचा हातभार लावला.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 6 : हरयाणा स्टिलर्स संघात नेतृत्वबदल, मोनू गोयत नवीन कर्णधार

सामन्याच्या पहिल्या सत्रात उत्तर प्रदेश योद्धाजने आक्रमक सुरुवात करत 3-4 गुणांची आघाडी कायम ठेवली होती. रिशांक देवाडीगा-प्रशांत कुमार राय- श्रीकांत जाधव या खेळाडूंनी चांगल्या चढाया करत उत्तर प्रदेशचं पारडं वर राखलं. मात्र काहीकाळाने पाटण्याने सामन्यात दमदार पुनरागमन करत उत्तर प्रदेशला धक्का दिला. पाटण्याकडून कर्णधार प्रदीप नरवालने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत उत्तर प्रदेशच्या महत्वाच्या खेळाडूंना मैदानाबाहेर ठेवलं. मध्यांतराला पाटण्याकडे 21-20 अशी एका गुणाची आघाडी होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसऱ्या सत्रात उत्तर प्रदेश योद्धाजने पाटण्याला कडवी टक्कर दिली. महाराष्ट्राच्या श्रीकांत जाधवने मॅरेथॉन चढाया करत 1-2 गुणांची कमाई सुरुच ठेवली. श्रीकांतला बचावात नितीश कुमार, सागर कृष्णा यांनी चांगली साथ दिली. सामना संपायला शेवटची काही सेकंद शिल्लक असताना श्रीकांत जाधवला एक गुण घेत सामना बरोबरीत करण्याची संधी होती. मात्र पाटण्याच्या बचावपटूंनी श्रीकांतची पकड करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.