श्रीकांत जाधव, कर्णधार प्रशांत कुमार राय यांच्या आक्रमक चढायांच्या जोरावर यूपी योद्धा संघाने इंटर झोन चॅलेंज स्पर्धेत दबंग दिल्लीवर मात केली. 38-36 अशा फरकाने सामना जिंकत उत्तर प्रदेशने दिल्लीला पराभवाचा धक्का दिला. रिशांक देवाडीगाच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या उत्तर प्रदेशकडून श्रीकांत जाधव, प्रशांत कुमार राय यांनी चढाईत तर नितेश, नरेंद्र कुमार आणि सचिन कुमार यांनी बचावफळीत आपली चमक दाखवली.

सामन्याच्या पहिल्या सत्रापासूनच उत्तर प्रदेशचे आपलं वर्चस्व कायम राखलं होतं. प्रशांत आणि श्रीकांत जाधवने आज दबंग दिल्लीची बचावफळी पूर्णपणे उध्वस्त करुन टाकली. अष्टपैलू राजेश नरवालने सामन्यात थोडीफार झुंज दिली. मात्र विशाल माने, जोगिंदर नरवाल, रविंदर पेहल हे अनुभवी खेळा़डू पुरते अपयशी ठरले. या कमकुवत बचावाचा फायदा घेत उत्तर प्रदेशने पहिल्या सत्राअखेरीस 25-17 अशी आघाडी घेतली.

दुसऱ्या सत्रात दबंग दिल्लीच्या चढाईपटूंनी सामन्यात रंगत आणली. नवीन कुमार आणि चंद्रन रणजीत यांनी चढाईत अनुक्रमे 13 व 10 गुणांची कमाई करत उत्तर प्रदेशची आघाडी कमी केली. शेवटच्या काही सेकंदांमध्ये दिल्लीच्या संघाला सामन्यात बरोबरी साधण्याची संधी आली होती, मात्र उत्तर प्रदेशच्या बचावपटूंनी दिल्लीच्या चंद्रन रणजीतची पकड करत सामन्यात आपली आघाडी कायम ठेवली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.