प्रो-कबड्डीत रविवारी झालेल्या सामन्यात गतविजेच्या पाटणा पायरेट्सला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. दुसऱ्या पर्वाचे विजेते आणि स्पर्धेतला सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळख असलेल्या यू मुम्बाने पाटण्याला १० गुणांच्या फरकाने हरवलं. या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पाटणा पायरेट्सचे प्रशिक्षक राममेहर सिंह यांनी मराठमोळे बचावपटू विशाल माने आणि सचिन शिंगाडे यांच्या खेळावर आपली नाराजी व्यक्त केली.
अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 5 – काशिलींग-श्रीकांत जाधवचा झंजावात, गतविजेते पाटणा पायरेट्स पराभूत
या सामन्यात प्रदीपने एकाकी झुंज देत २० गुणांची कमाई केली. “प्रदीप सामन्यात आपली कामगिरी चोख बजावेल याची मला खात्री होती. मात्र विशाल मानेसारखा खेळाडू बचावात एकही गुण मिळवत नाही, हे धक्कादायक आहे. त्याच्या खेळाला मी शून्य मार्क देईन. सचिन शिंगाडेचा खेळही या सामन्यात चांगला झालेला नाही. त्यामुळे बचावपटूंच्या निराशाजनक कामगिरीमुळेच आम्हाला पराभवाचा सामना करावा लागला.” विशाल आणि सचिनच्या कामगिरीवर राममेहर सिंह यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

मुम्बाविरुद्धचा सामना आम्ही जिंकू शकलो असतो. प्रदीप त्याच्या परीने गुण मिळवत होता. पण संघातले सिनीअर बचावपटू असा निराशाजनक खेळ करणार असतील तर चढाईपटूंनी कितीही चांगला खेळ केला तर संघ हरणारच. सर्वसाधारणपणे प्रदीप ज्या सामन्यात चांगला खेळतो, त्या सामन्यात आम्ही जिंकतोच. मात्र मुम्बाविरुद्ध विशाल आणि सचिनने केलेला खेळ हा अत्यंत निराशाजनक होता.
पाटणा पायरेट्सचा पुढचा सामना हा १५ सप्टेंबर रोजी तेलगू टायटन्सविरुद्ध रंगणार आहे. या सामन्यात राहुल चौधरी विरुद्ध प्रदीप नरवाल हे द्वंद्व क्रीडारसिकांना अनुभवता येणार आहे. त्यामुळे या सामन्यात पाटण्याचे दोन मराठमोळे बचावपटू चांगली कामगिरी करुन आपल्या प्रशिक्षकांचा विश्वास जिंकतात का हे पहावं लागणार आहे.