तब्बल २० गुणांची पिछाडी भरुन काढत तेलगू टायटन्सच्या संघाने इंटर झोनल स्पर्धेत पुणेरी पलटण संघाला चांगलीच टक्कर दिली. मात्र अखेरच्या काही मिनीटात पुण्याच्या गिरीश एर्नेक आणि धर्मराज चेरलाथन या बचावपटूंनी राहुल चौधरीच्या केलेल्या पकडीमुळे पुणेरी पलटणने सामना आपल्या खिशात घातला. अखेरच्या क्षणात झालेल्या अटीतटीच्या लढतीत पुणेरी पलटणने तेलगू टायटन्सवर ४२-३७ अशी मात केली.
पहिल्या सत्रात पुणेरी पलटण संघाने अक्षरशः तेलगू टायटन्सचा धुव्वा उडवला. अवघ्या १० ते १५ मिनीटांच्या खेळात तेलगू टायटन्सला दोनदा ऑलआऊट केलं. पहिल्या सत्रात एका क्षणापर्यंत पुणेरी पलटणकडे १९-० अशी घसघशीत आघाडी होती. मात्र एलंगेश्वरन या खेळाडूने एकाच चढाईत पुण्याच्या ४ खेळाडूंना बाद करत तेलगू टायटन्ससाठी संघात परतण्याचे मार्ग खुले करुन दिले. यानंतर तेलगू टायटन्सने सामन्यात पुनरागमन करत पुण्याला ऑलआऊट करण्याची किमया साधली.
मध्यंतरापर्यंत पुणेरी पलटण संघाकडे १० ते १५ गुणांची आघाडी होती. मात्र दुसऱ्या सत्रात तेलगू टायटन्सचा कर्णधार राहुल चौधरीने खेळाची सुत्र आपल्या हाती घेत मॅरेथॉन रेड करायला सुरुवात केली. तेलगू टायटन्सने अचानक केलेल्या हल्ल्यामुळे पुणेरी पलटणचा संघ काही काळ गोंधळलेला दिसत होता. त्यात विशाल भारद्वाज, रोहीत राणा या बचावपटूंनी पुणेरी पलटणच्या चढाईपटूंना आपल्या जाळ्यात अडकवलं. त्यामुळे काही काळ पुण्याचा संघ बॅकफूटवर ढकलला गेला. मात्र मोक्याच्या क्षणी पुण्याच्या बचावपटूंनी तेलगूच्या राहुल चौधरीला पकडत सामन्याचं पारड आपल्याकडे झुकवलं.
पुणेरी पलटणकडून कर्णधार दिपक हुडाने ९, राजेश मोंडलने ३ गुणांची कमाई केली. त्याला गिरीश एर्नेक आणि संदीप नरवाल या बचावपटूंनी चांगली साथ दिली. त्यामुळे अखेरच्या मिनीटापर्यंत रंगलेल्या या सामन्यात पुणेरी पलटणच्या संघाने बाजी मारली.