प्रो-कबड्डीचा सातवा हंगाम आपल्या अंतिम टप्प्यात पोहचलेला असताना, दबंग दिल्ली आणि बंगाल वॉरियर्स या दोन संघांनी प्ले-ऑफच्या सामन्यांमध्ये आपलं स्थान पक्कं केलं आहे. दिल्लीचा संघ १७ सामन्यांनंतर ७२ गुणांसह पहिल्या तर बंगालचा संघ १८ सामन्यांनंतर ६८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे आता प्ले-ऑफच्या उर्वरित ४ जागांसाठी आता ९ संघात स्पर्धा बघायला मिळणार आहे.

दबंग दिल्ली व बंगाल वॉरियर्स दोन्ही संघानी प्ले-ऑफ मध्ये प्रवेश मिळवला असला तरी त्याना पहिल्या दोन क्रमांकावर स्थान टिकवण्यासाठी उर्वरित सामने ही महत्वाचे असणार आहेत. गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानवर असलेले संघ थेट सेमी फायनलसाठी पात्र ठरणार आहेत.

प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी शर्यतीत असलेल्या संघांपैकी हरयाणा स्टीलर्सने किमान १ विजय आणि १ सामना बरोबरीत राखला तरी त्यांच्यासाठी प्ले ऑफचे दरवाजे खुले होतील. तर यू मुम्बा, बंगळुरू बुल्स आणि युपी योद्धा यांना उर्वरित सामान्यापैकी किमान २-३ सामन्यांत विजय आवश्यक आहेत. जयपूर पिंक पँथर्स, पुणेरी पलटण, पाटणा पायरेट्स, गुजरात फॉर्च्यून जायंट्स आणि तेलुगु टायटन्सला यांना उर्वरित सर्व सामने जिंकण्याबरोबरच इतर संघाच्या निकालावरही अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे या संघांसाठी प्ले-ऑफचा प्रवास खडतर असेल.