पुणे म्हणजे विद्येचे माहेरघर. पण कोलकाता, गोवा, चेन्नई आणि इशान्येकडील राज्यांप्रमाणे आता पुण्याची फुटबॉलनगरी ही ओळख बनू लागली आहे. कल्याणी भारत एफसी या पुण्याच्या तिसऱ्या फुटबॉल संघाची घोषणा रविवारी करण्यात आली. इंडियन सुपर लीगमध्ये पुणे सिटी एफसी तसेच आय-लीग फुटबॉल स्पर्धेत आता पुणे एफसीनंतर भारत एफसी हा पुण्याचा दुसरा संघ ठरणार आहे.
इंग्लंडचे माजी फुटबॉलपटू स्टुअर्ट व्ॉटकिस हे भारत एफसीचे मुख्य प्रशिक्षक तर स्टॅनली रोझारियो हे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून कार्यरत असतील. ‘‘भारत एफसीचे घरच्या मैदानावरील सामने बालेवाडीत खेळवण्यात येतील. भारती विद्यापीठात आमचे खेळाडू सराव करणार असून लवकरच मुंडवा येथे अखिल भारतीय फुटबॉल महासंघ आणि आशियाई फुटबॉल महासंघाच्या नियमांनुसार अद्ययावत सोयीसुविधा उभारल्या जाणार आहेत. त्याचबरोबर तळागाळातून गुणवान खेळाडूंचा शोध घेतला जाणार आहे. भारत एफसीचा आय-लीगमधील पहिला सामना जानेवारी महिन्यात होणार असला तरी लवकरत आम्ही खेळाडू करारबद्ध करणार आहोत. इंडियन सुपर लीग स्पर्धेवर आमचे बारकाईने लक्ष असून या स्पर्धेतील तसेच आशियातील खेळाडूंना करारबद्ध करण्याचा आमचा विचार आहे,’’ असे कल्याणी समूहाचे कार्यकारी संचालक अमित कल्याणी यांनी सांगितले.