बलाढय़ मोहन बागान संघावर सडनडेथद्वारा ७-६ असा विजय नोंदवित पुणे फुटबॉल क्लबने (पीएफसी) भूतानमध्ये सुरू असलेल्या किंग्ज चषक फुटबॉल स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. त्यांची आता विजेतेपदासाठी बांगलादेशच्या शेख जमाल धन्मोंदी संघाशी गाठ पडणार आहे.
शेवटपर्यंत चुरशीने झालेल्या उपांत्य लढतीत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक गोल केला. मोहन बागान संघाच्या पंकज मौला याने २४ व्या मिनिटाला गोल करीत संघास आघाडी मिळवून दिली. मात्र या आघाडीचा आनंद त्यांना फार काळ घेता आला नाही. ३८ व्या मिनिटाला पीएफसी संघाकडून खेळणारा पुण्याचा प्रकाश थोरात याने सुरेख गोल करीत १-१ अशी बरोबरी साधली. त्यानंतर दोन्ही संघांनी गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले मात्र त्यामध्ये त्यांना यश मिळाले नाही. त्यामुळे सामना पूर्ण वेळेत १-१ असा बरोबरीत राहिला.
टायब्रेकरमध्ये पीएफसी संघाच्या रियुजी सुओका, ल्युसियानो साब्रोसा, अराटा इझुमी, लालरेम्पुईया फनाई व बिनीश बालन यांनी गोल करण्यात यश मिळविले. मोहन बागान संघाकडून पिअरी बोया, कात्सुमी युसा, रणदीपसिंग, तीर्थकार सरकार व लालकमल भौमिक यांनी गोल केले. त्यामुळे टायब्रेकरमध्ये ५-५ अशी बरोबरी झाली. सडनडेथमध्ये पीएफसी संघाचा कर्णधार अनास एडथोडिका याने पेनल्टी किकवर गोल केला. मोहन बागानच्या प्रतीक चौधरी याने पेनल्टी किकवर मारलेला फटका पीएफसी संघाचा गोलरक्षक अमिरदरसिंग याने शिताफीने अडविला.