भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. तिने महिला एकेरीच्या अंतिम फेरीत नागपूरची मराठमोळी खेळाडू मालविका बनसोडचा अवघ्या ३५ मिनिटांत एकतर्फी पराभव केला. दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूने सरळ गेममध्ये २१-१३, २१-१६ असा विजय मिळवला. सिंधू दुसऱ्यांदा या स्पर्धेत चॅम्पियन बनली आहे. यापूर्वी २०१७ मध्ये तिने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.

सिंधूने उपांत्य फेरीत पाचव्या मानांकित रशियन प्रतिस्पर्धी इव्हगेनियाच्या रिटायर्ड हर्टनंतर अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्याचवेळी मालविकाने उपांत्य फेरीत अनुपमा उपाध्यायचा १९-२१, २१-१९, २१-७असा पराभव करून विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश केला. करोनाच्या प्रकरणांमुळे, यावेळी अनेक अव्वल खेळाडूंच्या अनुपस्थितीत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या महामारीमुळे २०२० आणि २०२१ मध्ये ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती.

हेही वाचा – IPL 2022 Mega Auction : ख्रिस गेलसह ‘या’ दिग्गज खेळाडूंची लीगमधून माघार!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिंधू व्यतिरिक्त, इशान भटनागर आणि तनिषा क्रास्टो या भारतीय जोडीने रविवारी टी हेमा नागेंद्र बाबू आणि श्रीवेद गुराझादा यांचा सरळ गेममध्ये पराभव करून मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले. इशान आणि तनिषाने अवघ्या २९ मिनिटांत बिगरमानांकित भारतीय जोडीविरुद्ध २१-१६, २१-१२असा विजय नोंदवला.