नवी दिल्ली : दोन ऑलिम्पिक पदक विजेती पी व्ही सिंधू आणि दोन दुहेरी जोडय़ांनी उबर चषक स्पर्धेतून माघार घेतली आहे. मात्र, पुरुष गटात भारतीय संघ मजबूत दिसत आहे. थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन २७ एप्रिलपासून चेंगडू येथे होणार आहे.

फेब्रुवारीत आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपदाच्या माध्यमातून पुनरागमन करणाऱ्या सिंधूने आतापर्यंत सहा स्पर्धामध्ये सहभाग नोंदवला आहे. पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी पुरेसा वेळ मिळावा याकरिता तिने माघार घेतली आहे. महिला दुहेरीत ट्रीसा जॉली व गायत्री गोपीचंद आणि अश्विनी पोनप्पा व तनीषा क्रॅस्टो यांनी देखील माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ऑलिम्पिक पात्रतेसाठी दुसऱ्या स्पर्धावर लक्ष केंद्रित केले आहे.

हेही वाचा >>>IPL 2024: शुबमन गिलच्या नावे आयपीएलमध्ये अजून एक मोठा रेकॉर्ड; रोहित, विराट, रहाणे सर्वांनाच टाकलं मागे

भारत थॉमस चषकात गतविजेता असून यावेळी भारताने मजबूत संघ उतरवला आहे. भारताच्या दहा सदस्यीय संघात लक्ष्य सेन, किदम्बी श्रीकांत, एच एस प्रणॉय, प्रियांशू राजावत व किरण जॉर्ज हे पाच एकेरीचे खेळाडू आहेत. जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असणाऱ्या सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी या पुरुष दुहेरी जोडीवर सर्वाचे लक्ष असेल. तसेच, एम आर अर्जुन व ध्रुव कपिला जोडीही आपले आव्हान उपस्थित करतील. उबर चषकासाठी युवा अनमोल खरब, अश्मिता चलिहा व तन्वी शर्मा यांनी महिला एकेरीत संधी देण्यात आली आहे.