R Ashwin Cryptic Post Goes Viral: ऑस्ट्रेलिया दौरा विराट कोहलीसाठी एखाद्या वाईट स्वप्नासारखा राहिला आहे. ज्या ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर विराटने खोऱ्याने धावा केल्या आहेत. त्या मैदानांवर त्याला दोन वनडे सामन्यांमध्ये खातही उघडता आलेलं नाही. यादरम्यान एडलेड सामन्यात विराटने बाद झाल्यानंतर चाहत्यांना हात दाखवत तो मैदानाबाहेर गेला, यामुळे त्याने निवृत्तीचे संकेत दिल्याच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान अश्विनने केलेल्या पोस्टने सध्या खळबळ उडाली आहे.
विराट कोहली आणि रोहित शर्मा ही जोडी ६ महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी मैदानावर उतरली. दोघांनीही चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अखेरचा सामना खेळला होता. रोहित शर्मा पहिल्या सामन्यात ८ धावा करत बाद झाला. तर त्याने दुसऱ्या सामन्यात ७४ धावांची खेळी केली. पण विराट दोन्ही सामन्यात भोपळाही फोडू शकला नाही.
एडलेडमधील भारताच्या पराभवानंतर, आर अश्विनने राईटचं चिन्ह असलेला फोटो पोस्ट केला. जो तिरंग्यात आहे आणि त्याखाली “जस्ट लिव्ह इट” लिहिलं आहे. अश्विनने शेअर केलेल्या या पोस्टचा संबंध चाहते विराट कोहलीशी जोडत आहेत.
अश्विनच्या ट्विटनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी प्रश्न विचारला की अश्विनने विराट कोहलीसाठी ही पोस्ट शेअर केली आहे का? कोहली एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्त होणार आहे का? एका चाहत्याने तर असंही लिहिलं की, अश्विन विराटला असा संदेश देत आहे की क्रिकेट त्याला सोडून जाण्यापूर्वी त्याने क्रिकेट सोडावं.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विराट कोहलीची परीक्षा सुरू आहे. पर्थमध्ये तो फक्त आठ चेंडूं खेळत एकही धाव न करता माघारी परतला. मिचेल स्टार्कच्या वाईड चेंडूवर कोनोलीने त्याला झेलबाद केलं. एडलेड वनडेमध्ये, युवा वेगवान गोलंदाज झेवियर बार्टलेटच्या इन-स्विंग चेंडूवर विराट कोहली पायचीत झाला. २०१२ नंतर ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर वनडेमध्ये कोहली पायचीत होत बाद होण्याची ही पहिलीच वेळ होती.
विराटची देहबोलीही पूर्वीसारखी दिसली नाही. त्यामुळे तो लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊ शकतो अशी चर्चा सुरू आहे. ऑस्ट्रेलिया दौरा विराटचा अखेरचा आंतरराष्ट्रीय दौरा असणार का, ही चर्चा चाहत्यांमध्ये सुरू आहे.
