R Ashwin On Team India Squad: आशिया चषक २०२५ स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. ही स्पर्धा युएईत रंगणार आहे. या स्पर्धेसाठी अजूनही भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली नाही. माध्यमातील वृत्तानुसार, या आठवड्यात भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते. यावेळी ही स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड करणं हे निवड समितीसाठी मुळीच सोपं नसणार आहे. भारतीय संघात ४ असे फलंदाज आहेत जे सलामीवीर फलंदाज म्हणून संघात स्थान मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार आहेत. दरम्यान या चौघांपैकी कोणाला संधी मिळणार? याबाबत आर अश्विनने मोठं वक्तव्य केलं आहे.
रोहित शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केल्यापासून संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा हे दोघे डावाची सुरूवात करण्यासाठी मैदानात येत आहेत. तर यशस्वी जैस्वालला आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत राखीव सलामीवीर फलंदाज म्हणून संधी दिली गेली होतीय कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिल देखील सलामीवीर फलंदाज म्हणून संघात स्थान मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. माध्यमातील वृत्तानुसार, यशस्वी जैस्वालची सलामीवीर फलंदाज म्हणून निवड होणं खूप कठीण आहे. पण भारताचा माजी खेळाडू आर अश्विनच्या मते, यशस्वी जैस्वालला सलामीवीर फलंदाज म्हणून संघात स्थान दिले जाऊ शकते.
आपल्या युट्यूब चॅनेलवर बोलताना आर अश्विन म्हणाला, ” आशिया चषक स्पर्धा तोंडावर असताना काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पहिला प्रश्न म्हणजे, शुबमन गिलला टी-२० संघात स्थान मिळणार का? कारण टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत यशस्वी जैस्वालला राखीव फलंदाज म्हणून संधी दिली गेली होती. रोहित शर्मा या संघाचा भाग नसेल त्यामुळे जैस्वालला संघात स्थान मिळणं निश्चित आहे.”
तसेच तो पुढे म्हणाला, “दुसरा सलामीवीर फलंदाज कोण असेल? शुबमन गिलने गेल्या मालिकेत दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याला टी-२० संघात पुनरागमन करण्याची संधी मिळणार का? संजू सॅमसनने टी-२० क्रिकेटमध्ये सलामीवीर फलंदाज म्हणून दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे मला तरी हेच वाटतं की, संघ निवडताना निवडकर्त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. निवडकर्त्यांना अनेक महत्वाचे निर्णय घ्यावे लागणार आहेत. जसं की, श्रेयस अय्यर पुनरागमन करणार का? काहीही असो, पण भारतीय संघ टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम संघ आहे.” माध्यमातील वृत्तानुसार, येत्या १९ ऑगस्टला भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते.