नदालचा झंझावात

राओनिकचा सरळ सेट्समध्ये मात; सेरेना, मिरजाना उपांत्य फेरीत

राओनिकचा सरळ सेट्समध्ये मात; सेरेना, मिरजाना उपांत्य फेरीत

दुखापती खेळाडूंना शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा कमकुवत करतात. परंतु विलक्षण इच्छाशक्तीचे प्रतीक असणाऱ्या नदालने विविध स्वरूपाच्या दुखापतींना टक्कर देत केलेले पुनरागमन अनोखे ठरले आहे. पूर्वीच्या झंझावाताने खेळणाऱ्या नदालने बुधवारी उंचपुऱ्या युवा मिलास राओनिकला निष्प्रभ करत ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. अन्य लढतीत ग्रिगोर दिमित्रोव्हने डेव्हिड गॉफीनचे आव्हान संपुष्टात आणत आगेकूच केली. विक्रमी ग्रँड स्लॅमच्या प्रतीक्षेत असलेल्या सेरेना विल्यम्ससह ३५ वर्षीय मिरजाना ल्युकिक बारोनीने उपांत्य फेरीत स्थान पटकावले.

१४ ग्रँड स्लॅम जेतेपदे नावावर असणाऱ्या नदालने राओनिकचा ६-४, ७-६ (९-७), ६-४ असा धुव्वा उडवला. वेगवान आणि अचूक सव्‍‌र्हिससाठी राओनिकची ख्याती आहे. मात्र त्याच्या सव्‍‌र्हिसला जोरकस परतीचे फटके, अचूक कोन साधत अचंबित करणाऱ्या फटक्यांनी नदालने बाजी मारली. उपांत्य फेरीत नदालसमोर दिमित्रोव्हचे असणार आहे. दिमित्रोव्हचा अडसर पार केल्यास अंतिम लढतीत नदाल-फेडरर हे दिग्गज समोरासमोर उभे ठाकू शकतात. २०१४ मध्ये फ्रेंच स्पर्धेनंतर नदालची ग्रँड स्लॅम स्पर्धेची पहिलीच उपांत्य फेरी असणार आहे. ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत खेळण्याची नदालची पाचवी तर ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत खेळण्याची २४वी वेळ असणार आहे.

नदालच्या नावावर ऑस्ट्रेलियन स्पर्धेचे एकच जेतेपद आहे. यंदा जेतेपदाची कमाई केल्यास चारही ग्रँड स्लॅम जेतेपदांवर दोनदा नाव कोरण्याचा विक्रम नदालला खुणावतो आहे. या विजयासह नदाल जागतिक क्रमवारीत अव्वल सहामध्ये झेप घेण्याची शक्यता आहे.

‘मिलोसविरुद्धचा सामना खडतर आव्हान होते. दोन आठवडय़ांपूर्वी ब्रिस्बेन स्पर्धेत त्याने मला नमवले होते. त्यामुळे कोर्टच्या आतल्या बाजूला राहून खेळ करण्यावर भर दिला. अफलातून सव्‍‌र्हिस करणाऱ्या खेळाडूला टक्कर देणे सोपे नाही. पण मी जिद्दीने प्रतिकार केला’, असे नदालने सांगितले.

अन्य लढतीत दिमित्रोव्हने गॉफीनवर ६-३, ६-२, ६-४ अशी मात केली. कारकीर्दीत दुसऱ्यांदा दिमित्रोव्हने ग्रँड स्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. पुढच्या लढतीत त्याच्यासमोर बलाढय़ नदालचे आव्हान असणार आहे.

महिलांमध्ये ३५ वर्षीय मिरजाना ल्युकिक बारोनीने पाचव्या मानांकित कॅरोलिना प्लिसकोव्हाला ६-४, ३-६, ६-४ असे नमवले. १९९९ नंतर ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत खेळण्याची मिरजानाची ही पहिलीच वेळ असणार आहे. यंदाच्या हंगामात सुरेख सूर गवसलेल्या जोहाना कोन्ताला ६-२, ६-३ असे नमवत सेरेना विल्यम्सने उपांत्य फेरी गाठली. या विजयासह सेरेनाने आठव्यांदा ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान पटकावले. १० बिनतोड सव्‍‌र्हिस आणि २५ विजयी फटक्यांसह सेरेनाने जोहानाला निरुत्तर केले.

सानिया उपांत्य फेरीत

सानिया मिर्झा आणि तिचा सहकारी इव्हान डोडिग यांनी रोहन बोपण्णा आणि गॅब्रिएला डाब्रोव्हस्की यांच्यावर थरारक विजय मिळवत मिश्र प्रकारात उपांत्य फेरी गाठली. सानिया-इव्हान जोडीने रोहन-गॅब्रिएला जोडीवर ६-४, ३-६, १२-१० अशी मात केली. सानिया-इव्हान जोडीने दोन मॅचपॉइंट वाचवले. पराभवासह रोहनचे स्पर्धेतील सर्व प्रकारातील आव्हान संपुष्टात आले आहे. दरम्यान कनिष्ठ गटात मुलींमध्ये भारताच्या झील देसाईने उपांत्यपूर्व फेरी गाठली. सर्बियाच्या पाचव्या मानांकित ओल्गा डॅनिलोव्हिकने दुखापतीमुळे माघार घेतल्याने झीलला विजयी घोषित करण्यात आले.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Rafael nadal