राफेल नदाल व रॉजर फेडरर यांच्याकडे लक्ष; दुखापतीमुळे जोकोव्हिच, वॉवरिंकापाठोपाठ मरेचीही माघार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पूर्वसंध्येला, बरोबर रविवारी ब्रिटनच्या अँडी मरेने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. नोव्हाक जोकोव्हिच, स्टान वॉवरिंका, केई निशिकोरी आणि मिलोस राओनीक यांच्यापाठोपाठ मरेनेही अमेरिकन खुल्या स्पर्धेतून माघार घेतल्याने जेतेपदाच्या शर्यतीत केवळ दोनच दावेदार राहिले आहेत. पुरुष एकेरीत काही आश्चर्यजनक निकाल नोंदवले न गेल्यास स्वित्र्झलडचा रॉजर फेडरर आणि स्पेनचा राफेल नदाल यांच्यापकी एक दावेदार निश्चित असेल.

नदाल आणि फेडरर हे दोन दिग्गज खेळाडू यापूर्वी अमेरिकन खुल्या स्पर्धेत कधीही एकमेकांसमोर आले नाहीत. त्यामुळे नदाल विरुद्ध फेडरर या सामन्याचा आस्वाद लुटण्याची संधी प्रेक्षकांना मिळण्याची शक्यता आहे. तेरा वर्षांच्या कारकीर्दीत ३७ सामन्यांत नदाल आणि फेडरर एकमेकांसमोर एकदाही उभे ठाकले नाही. मात्र, यावेळी त्यांच्यातील कडव्या झुंजीचा आस्वाद मिळण्याची शक्यता वाढली आहे.

तीन वर्षांनंतर नदाल पहिल्यांदाच जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे आणि त्याने २०१० व २०१३मध्ये अमेरिकन खुली स्पर्धा जिंकली आहे. १५ ग्रँडस्लॅम नावावर असलेला नदाल चार वर्षांनी येथे पुन्हा जेतेपद पटकावण्यासाठी उत्सुक झाला आहे. मात्र, त्याच्या मार्गात प्रमुख अडथळा असेल तो १९ ग्रँडस्लॅम नावावर असलेल्या फेडररचा. २००४ ते २००८ या कालावधीत फेडररने न्यूयॉर्क येथे सलग पाच वेळा चषक उंचावला आहे आणि नऊ वर्षांनंतर येथे पुन्हा बाजी मारण्यासाठी तो आतुर आहे. फेडरर ही किमया साधण्यास यशस्वी झाला तर अमेरिकन स्पर्धेच्या इतिहासात सर्वात वयस्कर जेता म्हणून त्याचे नाव नोंदवले जाईल.

शारापोव्हाचे पुनरागमन, व्हिसन दावेदार

महिला एकेरीत अनुभवी व्हिनस विल्यम्सला जेतेपदाची दावेदार मानले जात असले तरी मारिया शारापोव्हा पुनरागमनाच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत जेतेपद पटकावण्यासाठी प्रयत्नशील असेल. सेरेना विल्यम्स आणि व्हिक्टोरिया अझारेंका या वैयक्तिक कारणास्तव या स्पर्धेत खेळणार नसल्याने जेतेपदाचे कवाडे सर्वासाठी खुली झाली आहेत. रोमानियाची सिमोना हालेप, चेक प्रजासत्ताकची कॅरोलिना प्लिस्कोव्हा, स्पेनची गार्गिन मुगूरूझा, युक्रेनची एलिना स्व्हिटोलिना, ब्रिटनची जोहान्ना कोंटा आणि रशियाची स्व्हित्लाना कुझनेत्सोव्हा यांना अमेरिकन खुली स्पर्धा जिंकण्याची संधी आहे.

उपांत्य फेरीत फेडरर वगळता इतर खेळाडूविरुद्ध खेळायला मला आवडेल. उपांत्य फेरीपेक्षा अंतिम फेरीत खेळणे विशेष असते, परंतु फेडररविरुद्ध उपांत्य फेरीतच खेळणे अपेक्षित असेल तर तो सामना अविश्वसनीयच असेल.

– राफेल नदाल

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rafael nadal and roger federer in the race of us open title
First published on: 28-08-2017 at 01:53 IST