‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणामुळे राजस्थानच्या एस. श्रीशांतसहित तीन क्रिकेटपटूंना अटक झाल्यापासून क्रिकेट क्षेत्रात दहशतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे सध्या तरी आयपीएलचा विजेता कोण ठरणार, यापेक्षा दिल्ली पोलिसांच्या या सापळ्यात आणखी कोण सापडणार, याचीच उत्कंठा अधिक आहे. मैदानांकडे वळल्यास दडपणाखाली वावरणाऱ्या राजस्थान रॉयल्सची खरी कसोटी बुधवारी ‘एलिमिनेटर’ सामन्यात आहे. सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या आयपीएल बाद फेरीच्या लढतीद्वारे एका संघाचे आव्हान संपुष्टात येईल. त्यामुळे राजधानीत होणाऱ्या या लढतीकडे सर्वाचे डोळे लागले आहेत. हैदराबादने सर्वानाच अचंबित करीत बाद फेरीपर्यंत दिमाखात मजल मारली आहे. त्यामुळे त्यांना कमी लेखून चालणार नाही, याची राजस्थानला पूर्ण कल्पना आहे.
कर्णधार राहुल द्रविडला राजस्थानच्या आव्हानाची धुरा सांभाळावी लागणार आहे. त्यामुळे मैदानावर जाऊन क्षमतेने कामगिरी करण्याची जबाबदारी त्याच्यावर असेल. पण संघावरील दडपण खूप आहे, हे कुणीही नाकारू शकणार नाही. त्यामुळे फलंदाजांचे आणि गोलंदाजांचे क्रम हाताळताना द्रविड बुधवारी तितक्याच आत्मविश्वासाने वावरेल का, हा क्रिकेटजगतापुढे प्रश्न आहे.
कागदावर पाहिल्यास राजस्थानचा संघ हैदराबादपेक्षा सरस आहे. दुसरीकडे सनरायजर्सची मदार आहे ती त्यांच्या गोलंदाजांवर. जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज डेल स्टेन (१८ बळी), लेग स्पिनर अमित मिश्रा (२० बळी) आणि अष्टपैलू थिसारा परेरा (१९ बळी आणि २२२ धावा) अशी त्यांची गोलंदाजांची फळी आहे. मिश्राला फिरकीसाठी साथ लाभते ती युवा लेग स्पिनर करण शर्माची. मधल्या षटकांमध्ये प्रतिस्पर्धी संघांवर अंकुश ठेवण्यासाठी हे दोघे उपयुक्त ठरतात. याचप्रमाणे १४ बळी घेणाऱ्या इशांत शर्माकडूनही त्यांना अपेक्षा आहेत.
फलंदाजी हा मात्र सनरायजर्सचा चिंतेचा विषय आहे. त्यांच्या एकाही फलंदाजाला तीनशे धवांचा टप्पा स्पध्रेत पार करता आलेला नाही. फक्त एका अर्धशतकासह पार्थिव पटेलने सर्वाधिक २९३ धावा केल्या आहेत. दुखापतीतून सावरलेल्या शिखर धवनने सलामीची धुरा सांभाळताना नऊ सामन्यांतील तीन अर्धशतकांसह २७८ धावा केल्या आहेत. थिसारा आणि डॅरेन सॅमी हे अष्टपैलू खेळाडू सामन्याचा निकाल पालटण्यात वाकबदार आहेत. अखेरच्या साखळी सामन्यात सॅमीने दोन षटकार ठोकून हैदराबाद संघासाठी बाद फेरीचे दार खुले केले.
राजस्थान रॉयल्स संघाची कामगिरी घरच्या मैदानावर नेहमीच बहरताना आढळली. शेन वॉटसनचा (५१३ धावा आणि ११ बळी) या यशात सिंहाचा वाटा आहे. याचप्रमाणे ४१ वर्षीय संघनायक द्रविडचे चिकाटी, संयम आणि सांघिकता हे गुण संघासाठी उपयुक्त ठरले. त्याने आतापर्यंत चार अर्धशतकांसह ४१६ धावा केल्या आहेत.
चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पध्रेसाठी भारतीय संघातून वगळण्यात आलेल्या अजिंक्य रहाणेने आयपीएलमधील कामगिरीनिशी आपले नाणे खणखणीत असल्याचे सिद्ध केले. त्याने एकंदर ४४९ धावा केल्या आहेत. स्टुअर्ट बिन्नी आणि ब्रॅड हॉग यांच्या योगदानाचाही राजस्थानच्या यशात वाटा आहे. युवा संजू सॅमसन दडपणाच्या परिस्थितीतही आत्मविश्वासाने खेळतो. सध्या ‘पर्पल कॅप’ परिधान करणारा जेम्स फॉल्कनर (२६ बळी) आणि केव्हॉन कुपर (१७ बळी) यांच्याकडे राजस्थानच्या गोलंदाजीचे नेतृत्व असेल.
सामना (एलिमिनेटर) : राजस्थान रॉयल्स वि. सनरायजर्स हैदराबाद
स्थळ : फिरोझशाह कोटला स्टेडियम, नवी दिल्ली
वेळ : रात्री ८ वाजल्यापासून
थेट प्रक्षेपण : सेट मॅक्स वाहिनीवर   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajasthan royals vs sunrisers hyderabad tough fight
First published on: 22-05-2013 at 01:59 IST