रमणदीप सिंगने केलेल्या दोन गोलांमुळेच भारताने अजेन्टिनावर ३-२ अशी मात करीत २१ वर्षांखालील गटाच्या सुलतान जोहर चषक हॉकी स्पर्धेत दुसरा विजय नोंदविला.
चुरशीच्या या सामन्यातील शेवटच्या दहा मिनिटांपर्यंत भारत १-२ असा पिछाडीवर होता. पण रमणदीपने ६० व्या व ६२ व्या मिनिटाला गोल करीत विजयश्री खेचून आणली. भारताचा पहिला गोल उपकर्णधार अफान युसुफ याने २३ व्या मिनिटाला केला होता. अर्जेन्टिनाकडून दोन्ही गोल कालरेस इबारा याने १६ व्या व ४२ व्या मिनिटाला केले. या सामन्यातील विजयासह भारताने साखळी गटात आपली गुणसंख्या सहा केली आहे. पहिल्या सामन्यात भारताने इंग्लंडवर २-१ अशी मात केली होती.
अर्जेन्टिनाचा हा लागोपाठ दुसरा पराभव आहे. पहिल्या लढतीत त्यांना मलेशियाने ४-२ असे पराभूत केले होते.
भारताने अर्जेन्टिनावर मात केली, तरी या लढतीत भारतीय खेळाडूंची कामगिरी अपेक्षेइतकी झाली नाही. मधली फळी व आघाडी फळीतील खेळाडूंमध्ये अपेक्षेइतका समन्वय नव्हता. १६ व्या मिनिटाला अर्जेन्टिनाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्याचा फायदा घेत इबारा याने गोल करीत संघाचे खाते उघडले. त्याने मारलेला चेंडू भारताचा गोलरक्षक हरलोतसिंग याला चकवत गोलमध्ये गेला. मात्र अर्जेन्टिनास या आघाडीचा आनंद फार वेळ घेता आला नाही. त्यानंतर सात मिनिटांनी अफान याने भारताचे खाते उघडले. त्याने रिव्हर्स फटका मारून हा गोल केला.
उत्तरार्धात सातव्या मिनिटाला अर्जेन्टिनाला पेनल्टी स्ट्रोकची संधी मिळाली. भारताचा कर्णधार मनप्रीतसिंगच्या पायाला चेंडू लागल्यामुळे त्यांना ही संधी देण्यात आली. इबारा याने पुन्हा अचूक फटका मारून गोल केला. १-२ अशी पिछाडी असूनही भारतीय खेळाडूंनी त्यानंतर जिद्दीने खेळ केला. ६० व्या मिनिटाला रमणदीप याने सुरेख फटका मारून गोल केला व २-२ अशी बरोबरी साधली. पाठोपाठ दोनच मिनिटांनी त्यानेच जोरदार चाल करीत आणखी एक गोल केला.