न्यूझीलंडविरुद्ध हॉकी मालिकेसाठी संघ जाहीर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिडलँड्स येथे १४ मेपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी २० सदस्यीय भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व आघाडीपटू राणीकडे सोपवण्यात आले आहे. दुखापतीमुळे आठ महिन्यांच्या विश्रांतीनंतर संघात पुनरागमन करणाऱ्या बचावपटू सुशिला चानूकडे उपकर्णधारपद दिले आहे.

युवा आणि अनुभवी खेळाडूंचा योग्य समतोल साधला गेलेल्या या संघात बचावाची जबाबदारी दीप ग्रेस एक्का, उदिता, सुनीता लाक्रा, गुरजीत कौर, सुशिला चानू पुखरमबाम आणि नमिता टोप्पो यांच्यावर असेल. रितू राणी, लिमिमा मिन्झ, नवज्योत कौर, मोनिका, रेणुका यादव, निक्की प्रधान आणि रीना खोकर मध्यरक्षणाची जबाबदारी सांभाळतील. तसेच राणी (कर्णधार), वंदना कटारिया, प्रीती दुबे, सोनिका आणि अनुपा बार्ला यांचा आघाडीच्या फळीत समावेश आहे.

यंदाच्या हंगामाचा भारताच्या वरिष्ठ हॉकी संघाने दिमाखदार प्रारंभ केला आहे. बेलारूसविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका भारताने आरामात जिंकली होती. याचप्रमाणे महिला हॉकी जागतिक लिगच्या दुसऱ्या टप्प्यातील अंतिम फेरीत भारताने चिलीला नमवण्याची किमया साधली आणि जूनमध्ये होणाऱ्या जागतिक लीगच्या उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. ‘‘न्यूझीलंडविरुद्धच्या दौऱ्यात भारतीय संघ उत्तम कामगिरी करून जूनमध्ये होणाऱ्या महत्त्वाच्या स्पध्रेत आत्मविश्वासाने उतरेल,’’ असा विश्वास  मुख्य प्रशिक्षक हॉलंडचे शोर्ड मारिजने यांनी व्यक्त केला.

भारतीय संघ –

गोलरक्षक : रजनी ईटीमार्पू, सविता. बचावपटू : दीप ग्रेस एक्का, उदिता, सुनीता लाक्रा, गुरजीत कौर, सुशिला चानू पुखरमबाम (उपकर्णधार), नमिता टोप्पो. मध्यरक्षक : रितू राणी, लिमिमा मिन्झ, नवज्योत कौर, मोनिका, रेणुका यादव, निक्की प्रधान, रीना खोकर. आघाडीपटू : राणी (कर्णधार), वंदना कटारिया, प्रीती दुबे, सोनिका, अनुपा बार्ला.

 

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rani rampal to lead indian women hockey team
First published on: 05-05-2017 at 02:32 IST