Ajinkya Rahane and Musheer Khan hit half centuries : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर ४१ वेळची चॅम्पियन मुंबई आणि दोन वेळचा चॅम्पियन विदर्भ यांच्यात रणजी ट्रॉफीचा जेतेपदाचा सामना खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने पहिल्या डावात २२४ धावा केल्या. प्रत्युत्तरात विदर्भाचा पहिला डाव १०५ धावांत आटोपला. दुसऱ्या डावात मुंबईने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दोन बाद १४१ धावा केल्या. सध्या मुशीर खान (५१) आणि कर्णधार अजिंक्य रहाणे (५८) क्रीजवर आहेत. पृथ्वी शॉ ११ धावा करून बाद झाला तर भूपेन लालवानी १८ धावा करून बाद झाला. यासह मुंबईने २६० धावांची आघाडी घेतली आहे.

अजिंक्य रहाणेला सूर गवसला –

मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेने रणजी ट्रॉफी फायनलमध्ये विदर्भाविरुद्धच्या दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले आहे. रहाणेने ८८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. रहाणेने विदर्भाचा गोलंदाज उमेश यादवच्या चेंडूवर सिग्नेचर स्टाइल कव्हर ड्राईव्ह मारत हे अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या कारकिर्दीतील हे ५७ वे अर्धशतक होते. याआधी रहाणेने गेल्या महिन्यात छत्तीसगडविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक झळकावले होते. तेथे त्याने ५६ धावांची खेळी खेळली. त्यानंतर इतर प्रत्येक सामन्यात तो धावा करण्यासाठी संघर्ष करताना दिसला.

विदर्भाचा पहिला डाव १०५ धावांवर गारद –

आज विदर्भाने तीन गड्यांच्या मोबदल्यात ३१ धावांवर खेळण्यास सुरुवात केली होती आणि पहिला धक्का अथर्व तायडेच्या रूपाने बसला. धवल कुलकर्णीने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अथर्वला २३ धावा करता आल्या. यानंतर शम्स मुलाणीची शानदार गोलंदाजडी पाहायला मिळाली. त्याने आदित्य ठाकरे आणि अक्षय वाडकरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. आदित्यला १९ तर ​​अक्षयला पाच धावा करता आल्या. यानंतर हर्ष दुबे (१), यश राठोड (२७) आणि यश ठाकुर (१६) बाद झाला. यानंतर उमेश यादव शेवटच्या विकेट्सच्या रुपाने बाद झाला. त्याला तनुषने बाद केले. अशा प्रकारे विदर्भाचा पहिला डाव १०५ धावांवर आटोपला. मुंबईकडून धवल कुलकर्णी, तुषार देशपांडे आणि तनुष यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.

हेही वाचा – IPL : कोहली-आरसीबी ऋणानुबंधाची १६ वर्ष, शेअर केला VIDEO

मुंबईचा पहिला डाव २२४ धावांवर आटोपला –

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या मुंबईसाठी सलामीवीर पृथ्वी शॉ आणि भूपेन ललवानी यांनी पहिल्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी केली. यश ठाकूरने ही भागीदारी तोडली. यानंतर हर्ष दुबेने पृथ्वीला क्लीन बोल्ड केले. या दोन विकेट्सनंतर विकेट्सची झुंबड उडाली. मुशीर खान सहा धावा करून बाद झाला. यानंतर कर्णधार रहाणे आणि श्रेयस अय्यर सात धावा करून बाद झाले. हार्दिक तामोरे पाच आणि शम्स मुलानी १३ धावा करून बाद झाला.

हेही वाचा – Ranji Trophy 2024 Final : रोहित शर्माच्या सहकाऱ्याने केली निवृत्तीची घोषणा, शेवटच्या सामन्यात घातला धुमाकूळ

अष्टपैलू शार्दुल ठाकूरने झळकावले अर्धशतक –

यानंतर अष्टपैलू शार्दुल ठाकूरने ३७ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने अर्धशतक झळकावले. शार्दुलने १३१.५८ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना हे अर्धशतक पूर्ण केले. तनुष कोटियन आठ धावा करून बाद झाला तर तुषार देशपांडे १४ धावा करून बाद झाला. अशाप्रकारे मुंबईचा डाव २२४ धावांवर आटोपला. विदर्भाकडून हर्ष दुबे आणि यश ठाकूर यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. तर उमेश यादवने दोन गडी बाद केले. आदित्य ठाकरेने एक विकेट घेतली.