Ranji Trophy 2025 Rohit Sharma flop show continues : रणजी ट्रॉफी २०२४-२५ चा दुसरा टप्पा २३ जानेवारीपासून सुरू झाला आहे. ज्यामध्ये टीम इंडियाचे अनेक मोठे खेळाडू खेळत आहेत. पहिल्या दिवशी रवींद्र जडेजा वगळता रोहित शर्मा, शुबमन गिल, ऋषभ पंत, यशस्वी जैस्वाल या दिग्गजांनी निराश केले होते. दुसऱ्या दिवशी रोहित शर्माकडून चाहत्यांना ‘चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती, पण दुसऱ्या डावातही रोहितने चाहत्यांची निराशा केली. तो खराब शॉट्स खेळून बाद झाला, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

दुसऱ्या डावाच्या सुरुवातीला रोहित शर्मा चांगल्या लयीत दिसत होता. रोहितने जम्मू-काश्मीरच्या गोलंदाजांविरुद्ध थोडी फटकेबाजी केली होती. ज्यामुळे सुरुवातीला रोहितचा स्ट्राईक रेट १०० च्या वर होता आणि त्याने ३ शानदार षटकारही मारले, पण रोहितला आपली लय जास्त काळ टिकवता आली नाही. दुसऱ्या डावात रोहित शर्मा ३३ चेंडूत २८ धावा करून बाद झाला. त्याला युधवीर सिंगने झेलबाद केले.

पहिल्या डावात केल्या होत्या अवघ्या ३ धावा –

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा १० वर्षांनंतर रणजी ट्रॉफी खेळत आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघाच्या फलंदाजांची खराब कामगिरी पाहून बीसीसीआयने सर्व खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याच्या सूचना दिल्या आहेत. आता रणजीमध्येही रोहितची खराब कामगिरी पाहायला मिळत आहे. तत्पूर्वी, पहिल्या डावात फलंदाजी करताना रोहित अवघ्या ३ धावा करून बाद झाला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाची वाढली चिंता –

१९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यात येणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा या स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी त्याचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय आहे. २० फेब्रुवारी रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. या सामन्यापूर्वी रोहित शर्माचे आणखी तीन सामने होणार आहेत. जिथे रोहित शर्मा इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेत सर्वांच्या नजरा त्याच्या फॉर्मवर असतील.