वृत्तसंस्था, बंगळूरु : गोलंदाजांनी केलेल्या सांघिक कामगिरीनंतर कर्णधार पृथ्वी शॉने (७१ चेंडूंत ६४ धावा) साकारलेल्या अर्धशतकामुळे उत्तर प्रदेशविरुद्ध रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यावर मुंबईने पकड मजबूत केली आहे. तिसऱ्या दिवसअखेर मुंबईकडे एकूण ३४६ धावांची आघाडी होती.
बंगळूरु येथे सुरू असलेल्या या पाचदिवसीय सामन्यात मुंबईने पहिल्या डावात ३९३ धावांची मजल मारली होती. त्यानंतर त्यांनी तुषार देशपांडे (३/३४), तनुश कोटियन (३/३५) आणि मोहित अवस्थी (३/३९) यांच्या भेदक माऱ्यामुळे उत्तर प्रदेशला १८० धावांवर रोखत पहिल्या डावात ११३ धावांची आघाडी मिळवली. त्यानंतर तिसऱ्या दिवसअखेर मुंबईची दुसऱ्या डावात १ बाद १३३ अशी धावसंख्या होती.
तिसऱ्या दिवशी २ बाद २५ धावांवरून पुढे खेळणाऱ्या उत्तर प्रदेशने ठरावीक अंतराने गडी गमावले. नवव्या क्रमांकावरील शिवम मावीने झुंजार फलंदाजी करताना ५५ चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांच्या साहाय्याने ४८ धावांची खेळी केली. मात्र त्याच्या व्यतिरिक्त केवळ माधव कौशिक (३८) याला ३० धावांचा टप्पा ओलांडता आला. मुंबईचा डावखुरा फिरकीपटू शम्स मुलानी या हंगामात बळी मिळवण्यात पहिल्यांदाच अपयशी ठरला.
त्यानंतर फलंदाजीला आलेल्या मुंबईकडून कर्णधार पृथ्वीने आक्रमक शैलीत फलंदाजी केली. त्याने केवळ ५६ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. याउलट त्याचा सलामीचा साथीदार यशस्वी जैस्वालने ५४व्या चेंडूंवर आपले खाते उघडले. अखेर १२ चौकारांच्या मदतीने ६४ धावा केल्यावर पृथ्वीला डावखुरा फिरकीपटू सौरभ कुमारने बाद केले. मग यशस्वी (११४ चेंडूंत नाबाद ३५) आणि अरमान जाफर (६७ चेंडूंत नाबाद ३२) यांनी संयमाने फलंदाजी केली.
मध्य प्रदेशला आघाडी
बंगालच्या शाहबाज अहमद (११६) आणि मनोज तिवारी (१०२) यांनी केलेल्या झुंजार शतकांनंतरही रणजी करंडकातील उपांत्य फेरीच्या सामन्यात मध्य प्रदेशने पहिल्या डावात आघाडी मिळवली. मध्य प्रदेशच्या ३४१ धावांच्या प्रत्युत्तरात बंगालचा पहिला डाव २७३ धावांत आटोपला. त्यामुळे मध्य प्रदेशला ६८ धावांची आघाडी मिळाली. त्यांच्याकडून पूनित दाते (३/४८), कुमार कार्तिकेय (३/६१) आणि सारांश जैन (३/६३) यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. मग मध्य प्रदेशने तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात २ बाद १६३ अशी मजल मारली होती.
संक्षिप्त धावफलक
मुंबई (पहिला डाव) : ३९३
उत्तर प्रदेश (पहिला डाव) : ५४.३ षटकांत सर्वबाद १८० (शिवम मावी ४८, माधव कौशिक ३८; तुषार देशपांडे ३/३४, तनुश कोटियन ३/३५, मोहित अवस्थी ३/३९)
मुंबई (दुसरा डाव) : ४२ षटकांत १ बाद १३३ (पृथ्वी शॉ ६४, यशस्वी जैस्वाल नाबाद ३५, अरमान जाफर नाबाद ३२; सौरभ कुमार १/३२)
