लंडन : दौरे-स्पर्धाची कार्यक्रमपत्रिका जुळवताना सर्वच राष्ट्रांच्या क्रिकेट मंडळांची दमछाक होत असते. त्यामुळे द्विराष्ट्रीय ट्वेन्टी-२० मालिकांच्या संख्येत कपात करून लीग क्रिकेटला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे, अशी सूचना भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) आगामी दौरे-स्पर्धा कार्यक्रमपत्रिकेत ट्वेन्टी-२० सामन्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. प्रत्येकी वर्षी अडीच महिन्यांचा कार्यकाळ इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२०साठी राखून ठेवण्यात आला आहे. सामन्यांची संख्या वाढल्यामुळे क्रिकेटच्या बहुप्रकारांमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंवरील खेळाचा ताण वाढला आहे. ‘‘ट्वेन्टी-२० प्रकारातील मालिकांची संख्या कमी व्हायला हवी. लीग क्रिकेट मोठय़ा प्रमाणात आहे. भारत, वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानचे खेळाडूही ते खेळत असतात. त्यामुळे ‘आयसीसी’ ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमधील थरार आणखी वाढेल,’’ असे शास्त्री यांनी सांगितले.