India Refused To Shake Hand with England to Call off Test Video: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला आहे. मँचेस्टर कसोटीत भारताच्या फलंदाजांनी शानदार फलंदाजी करत संघाला सामन्यात कायम ठेवलं. यासह आता मालिकेत २-१ च्या फरकाने पुढे आहे. आता दोन्ही संघ ओव्हलच्या मैदानावर मालिकेतील अखेरचा कसोटी सामना खेळणार आहेत. पण या सामन्यात रवींद्र जडेजा आणि भारताने इंग्लंडचा सामना लवकर संपवण्याचा प्रस्ताव मात्र नाकारला, या प्रसंगाचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

भारताकडून शुबमन गिल, केएल राहुल, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी उत्कृष्ट फलंदाजी करत इंग्लंडच्या गोलंदाजांना जेरीस आणलं. गिल, जडेजा आणि सुंदर यांनी दुसऱ्या डावात शतकं झळकावली आणि इंग्लंडचे गोलंदाज आणि फिल्डरही दमले होते. भारताने ५ सत्र फलंदाजी करत मँचेस्टर कसोटी वाचवली, जे एका सामन्यातील विजयाच्या बरोबरीचं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

भारत-इंग्लंड मँचेस्टर कसोटीत अखेरच्या षटकांमध्ये ड्रामा

अखेरच्या काही षटकांमध्ये मैदानावर मोठा ड्रामा पाहायला मिळाला. जडेजा ८९ धावांवर आणि सुंदर ८० धावांवर खेळत असताना इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स जडेजाबरोबर हात मिळण्यासाठी आला. याचा अर्थ दोन्ही संघांच्या संमतीने हा सामना अनिर्णित होत इथेच संपल्याचे जाहीर करता येईल. पण जडेजाने मात्र या गोष्टीसाठी नकार दिला. इंग्लंडचे सर्व खेळाडू जडेजासमोर घोळका करून उभे होते. एकेक जण येऊन जडेजाची समजूत काढत होते. तर जॅक क्रॉली जडेजाशी थेट वाद घालू लागला, पण जडेजाने नकार दिला. इतकंच काय तर त्याने ड्रेसिंग रूमकडे पाहत कर्णधारालाही विचारलं की काय ठरवायचं, मात्र त्यानेही सामना संपवायला सहमती दिली नाही.

जडेजा आणि सुंदर दोघेही मेहनत करत शतकाच्या जवळ पोहोचले होते. त्यामुळे सामन्यात १५ षटकं बाकी होती आणि तितक्यात त्यांची शतकही सहज झाली असती. जडेजाने षटकार लगावत आपलं शतक पूर्ण केलं तर वॉशिंग्टन सुंदरनेही त्याच्या पुढच्याच षटकात आपलं शतक झळकावलं. वॉशिंग्टन सुंदरचं कसोटी कारकिर्दीतील हे पहिलं शतक आहे. रवींद्र जडेजाने हात मिळवण्यास नकार दिल्याचं पाहता बेन स्टोक्स चांगलाच वैतागला होता. इतकंच तर इंग्लंडचे खेळाडूही सलग पाच सत्र फिल्डिंग करून दमले होते.

कसोटी सामना जर अनिर्णित राहणार असेल तर अखेरच्या तासाभरात दोन्ही संघांच्या सहमतीने संपल्याचे जाहीर केले जाते. बेन स्टोक्सने याच नियमासह जडेजाशी हात मिळवत सामना अनिर्णित होत संपला असल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यासाठी पोहोचला. पण भारताने मात्र याला नकार दिला आणि जडेजा-सुंदरची शतकं होताच दोन्ही संघातील खेळाडूंनी हात मिळवला आणि सामन्याचा निकाल जाहीर झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सामना अनिर्णितच राहणार होता, त्यामुळे लवकर निकाल लागावा असा स्टोक्सचा विचार होता. तर जडेजा आणि सुंदरने मेहनत करून साकारलेल्या खेळीचं फळ त्यांना शतकाच्या रूपात मिळावं असा विचार भारतीय संघाचा होता.