Joe Root Ravindra Jadeja Funny Video: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय सुरूवातीला फ्लॉप ठरला. पण शेवटी जो रूट आणि बेन स्टोक्सने मिळून इंग्लंडचा डाव सांभाळला. पहिल्या दिवसाअखेर जो रूट ९९ धावांवर नाबाद माघारी परतला. तर बेन स्टोक्स ३९ धावांवर नाबाद आहे. इंग्लंडला पहिल्या दिवशी ४ गडी बाद २५१ धावा करता आल्या आहेत.
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना सुरूवातीला मोठे धक्के बसले. सलामावीर फलंदाज बेन डकेट आणि जॅक क्रॉली स्वस्तात माघारी परतले. इंग्लंडला ४३ धावांवर पहिला आणि ४४ धावांवर दुसरा धक्का बसला. त्यानंतर ओली पोप आणि जो रूटने मिळून इंग्लंडचा डाव सांभाळला. दोघांनी मिळून शतकी भागीदारी केली. ओली पोप ४४ धावांवर माघारी परतला. त्यानंतर हॅरी ब्रुक ११ धावांवर माघारी परतला. शेवटी बेन स्टोक्स आणि जो रूटने मिळून इंग्लंडचा डाव सांभाळला.
रवींद्र जडेजा- बेन स्टोक्सचा व्हिडीओ व्हायरल
या सामन्यातील पहिल्या दिवसातील शेवटचे षटक टाकण्यासाठी आकाशदीप गोलंदाजीला आला. या षटकात जो रूटला आपलं शतक पूर्ण करण्याची संधी होती. पण त्याचं शतक थोडक्यात हुकलं. शेवटचं षटक सुरू झालं, त्यावेळी जो रूट ९६ धावांवर फलंदाजी करत होता. पहिला चेंडू निर्धाव राहिला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर त्याने कट शॉट मारून २ धावा घेतल्या. रूट ९८ धावांवर पोहोचला. त्याला शतक पूर्ण करण्यासाठी २ धावा करायच्या होत्या. तिसरा चेंडू निर्धाव राहिला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर त्याने डिप पॉईंटच्या दिशेने शॉट मारला. पहिली धाव त्याने वेगाने घेतली, दुसरी धाव घेऊन त्याच्याकडे शतक पूर्ण करण्याची संधी होती. पण, चेंडू नेमका रवींद्र जडेजाच्या हातात गेला. जडेजाच्या हातात चेंडू असताना कुठलाही फलंदाज धाव घेण्याची चूक करू शकत नाही.
रुट दुसरी धाव घेण्याच्या तयारीत होता, पण जडेजाला पाहून त्याचा शहाणपण सुचलं. जडेजाने चेंडू उचलला आणि थ्रो करण्याचा इशारा केला. जडेजा त्याला हिम्मत असेल तर पळ असं इशाऱ्यात म्हणाला. पण त्यानंतर, जो रूटने माघार घेतली आणि धाव घेण्यास नकार दिला. हे पाहून जो रूटलाही हसू आवरलं नाही. पुढील दोन चेंडू निर्धाव राहिले, त्यामुळे जो रूटला ९९ धावांवर नाबाद माघारी परतावं लागलं.