India vs England 4th Test: मँचेस्टरच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याचा थरार सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडने भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. भारतीय संघाकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शन आणि ऋषभ पंत या तिघांनी अर्धशतकं झळकावली. भारताचा पहिला डाव ३५८ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडच्या सलामीवीरांनीही दमदार सुरुवात केली.
भारतीय संघाचा पहिला डाव ३५८ धावांवर आटोपल्यानंतर इंग्लंडकडून जॅक क्रॉली आणि बेन डकेटची जोडी मैदानावर आली. या जोडीने इंग्लंडला दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी मिळून ३१ षटकं खेळून काढली. पहिल्या विकेटसाठी दोघांनी १६६ धावा जोडल्या. ही जोडी भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरत होती. दोघांची अर्धशतकं पूर्ण झाली होती. इतक्यात रवींद्र जडेजाने जॅक क्रॉलीला बाद करत माघारी धाडलं.
तर झाले असे की, भारतीय संघाकडून ३२ वे षटक टाकण्यासाठी रवींद्र जडेजा गोलंदाजीला आला. त्यावेळी जॅक क्रॉली स्ट्राइकवर होता. रवींद्र जडेजाने टाकलेला षटकातील शेवटचा चेंडू टप्पा पडताच बाहेरच्या दिशेने वळला. त्यामुळे क्रॉलीला चेंडूचा अंदाज आला नाही. चेंडू बॅटची कडा घेऊन स्लिपमध्ये असलेल्या केएल राहुलच्या हातात गेला.
केएल राहुलने कुठलीही चूक न करता सोपा झेल घेतला. मात्र पंचांनी तिसऱ्या पंचांकडून झेल व्यवस्थित पकडला आहे की नाही याची खात्री करून घेतली. रिप्लेमध्ये पाहिल्यानंतर तो बाद असल्याचं स्पष्ट. त्यानंतर जॅक क्रॉली ८४ धावांवर माघारी परतला.
भारतीय संघाचा पहिला डाव
या सामन्यात भारतीय संघाला पहिल्या डावात फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. भारताकडून डावाची सुरूवात करण्यासाठी आलेल्या यशस्वी जैस्वालने ५८, केएल राहुलने ४६ , साई सुदर्शनने ६१, शुबमन गिल १२, ऋषभ पंत ५४, रवींद्र जडेजा २०, शार्दुल ठाकूर ४१, वॉशिंग्टन सुंदर २७, अंशुल कंबोज ० आणि जसप्रीत बुमराह ४ धावांवर माघारी परतला. भारताचा पहिला डाव ३५८ धावांवर आटोपला.