माद्रिद : रेयाल माद्रिदने ‘ला लिगा’ फुटबॉल स्पर्धेच्या सामन्यात बार्सिलोनाला २-१ असे नमवत पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांविरुद्धची गेल्या काही काळापासून सुरू असलेली पराभवाची मालिका खंडित केली. फुटबॉलविश्वात ‘एल क्लासिको’ नावाने प्रसिद्ध असलेल्या या सामन्यानंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले.
यंदाच्या हंगामात हे पारंपरिक प्रतिस्पर्धी प्रथमच एकमेकांविरुद्ध खेळत होते. किलियन एम्बापे (२२व्या मिनिटाला) आणि जुड बेलिंगहॅम (४३व्या मिनिटाला) यांच्या गोलमुळे रेयाल माद्रिदला विजय मिळवता आला. यासह माद्रिद ‘ला लिगा’च्या गुणतालिकेत बार्सिलोनापेक्षा पाच गुणांनी पुढे गेला आहे. बार्सिलोनाच्या पेड्रीला सामना संपण्याच्या आधी लाल कार्ड मिळाल्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू आक्रमक झाले. हा वाद सामना संपल्यानंतरही सुरूच राहिला. यामध्ये माद्रिदचा आक्रमकपटू व्हिनिशियस ज्युनियर आणि बार्सिलोनाचा लामिन यमाल यांचा प्रामुख्याने समावेश होता.
या सामन्यापूर्वी यमालने एका मुलाखतीत माद्रिदविरोधात विधाने केली होती. याचेच पडसाद सामन्यानंतर उमटले. पंचांनी सामना समाप्तीची शिट्टी वाजवल्यानंतर यमाल आणि माद्रिदचा गोलरक्षक थिबो कोर्टवा, तसेच बचावपटू डॅनी कार्वाहाल यांच्यात वाद झाला. मग व्हिनिशियस आणि यमाल यांच्यात शाब्दिक चकमक झाली. मात्र, अन्य काही खेळाडूंनी मध्यस्ती करत हा वाद मिटवला. त्याआधी, प्रत्यक्ष सामन्यात एम्बापेने २२व्या मिनिटाला माद्रिदला आघाडी मिळवून दिली.
मग बार्सिलोनाच्या फर्मिन लोपेझने (३८व्या मि.) गोल करत सामना १-१ असा बरोबरीत आणला. परंतु ही बरोबरी केवळ पाच मिनिटे टिकली. तारांकित मध्यरक्षक बेलिंगहॅमने ४३व्या मिनिटाला गोल करत माद्रिदला २-१ असे आघाडीवर नेले. दुसऱ्या सत्राच्या ५२व्या मिनिटाला माद्रिदला पेनल्टी मिळाली, पण एम्बापेने मारलेली किक बार्सिलोना गोलरक्षक वोइचेक शेजनी याने अडवली. यानंतर माद्रिदने बचाव भक्कम राखत विजय नोंदवला. माद्रिदने या हंगामात १३ पैकी १२ सामने जिंकले आहेत.
