ऋषिकेश बामणे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसारख्या महत्त्वाच्या स्पर्धामध्ये आपल्या नावावर एखादा तरी विक्रम असावा, अशी प्रत्येक खेळाडूची आणि संघाचीही इच्छा असते. यंदाच्या विश्वचषकातही अनेक विक्रम रचले गेले. परंतु काही असे विक्रमसुद्धा आहेत, जे उर्वरित दोन सामन्यांतसुद्धा अबाधित राहणार आहेत. सचिन तेंडुलकरच्या विश्वचषकातील सर्वाधिक २,२७८ धावा आणि सर्वाधिक २१ अर्धशतके तसेच रिकी पाँटिगचा सर्वाधिक ४६ सामने खेळण्याचा पराक्रम, तर ग्लेन मॅकग्राचा सर्वाधिक ७१ बळींचा विक्रमसुद्धा या विश्वचषकात मोडला जाण्याची शक्यता नाही. अशाच काही विक्रमांवर टाकलेली एक नजर-

५० आणि ६० षटकांचा विश्वचषक जिंकणारा एकमेव संघ – भारत

१९७५, १९७९ आणि १९८३च्या विश्वचषकात ६० षटकांचे सामने खेळवण्यात येत होते. १९८७ पासून ५० षटकांच्या सामन्यांना सुरुवात झाली. भारताने १९८३ आणि २०११मध्ये विश्वविजेतेपद मिळवले आहे. त्यामुळेच ६० आणि ५० षटकांचा विश्वचषक जिंकणारा भारत हा एकमेव संघ आहे. यंदाच्या विश्वचषकात १९७५ व १९७९च्या विजेत्या वेस्ट इंडिजला या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी होती. परंतु त्यांचे आव्हान उपांत्य फेरीपूर्वीच संपुष्टात आले.

विश्वविजेतेपदजिंकणारा सर्वात युवा कर्णधार – कपिल देव

क्रिकेट विश्वातील आजपर्यंतचा सर्वाधिक यशस्वी अष्टपैलू खेळाडू म्हणून कपिल देव यांना ओळखले जाते. भारतात ‘क्रिकेटक्रांती’ घडवणाऱ्या कपिल यांनी १९८३ मध्ये ज्यावेळी विश्वचषक उंचावला, तेव्हा त्यांचे वय अवघे २४ वर्ष होते. गेल्या ३६ वर्षांपासून हा विक्रम अबाधित असून सध्याच्या विश्वचषकातील उपांत्य फेरीत पोहोचलेल्या चार कर्णधारांपैकी विराट कोहली, आरोन फिंच आणि ईऑन मॉर्गन यांनी वयाची तिशी ओलांडली आहे, तर केन विल्यम्सनचे २८ वर्षांचा आहे. त्यामुळे पुढील विश्वचषकापर्यंत कपिल यांचा विक्रम कोणीच मोडू शकत नाही.

सर्वाधिक विश्वचषक स्पर्धा – तेंडुलकर आणि मियाँदाद

भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि पाकिस्तानचा जावेद मियाँदाद यांच्या नावावर प्रत्येकी सहा विश्वचषक खेळण्याचा विक्रम आहे. मियाँदादने १९७५ ते १९९६ आणि सचिनने १९९२ ते २०११ या दरम्यानच्या विश्वचषकांमध्ये आपापल्या देशांचे प्रतिनिधित्व केले. यंदाच्या विश्वचषकात फक्त वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल हा कारकीर्दीतील पाचवा विश्वचषक खेळणारा फलंदाज होता. मात्र तो पुढील महिन्यात निवृत्ती पत्करत असल्यामुळे सचिन-मियाँदाद यांचा विक्रम मोडता येणे आव्हानात्मक आहे.

तीन वेळा ३००हून अधिक धावांचा पाठलाग – आर्यलड

३००हून अधिक धावांचा पाठलाग करताना साहजिकच दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघावर दडपण असते. त्यामुळेच यंदाच्या विश्वचषकात आतापर्यंत बांगलादेश या एकमेव संघालाच ३०० धावांचा यशस्वी पाठलाग करता आला आहे. परंतु आर्यलडसारख्या दुबळ्या संघाने विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक तीन वेळा ३००हून अधिक धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला आहे. २०११मध्ये केव्हिन ओ’ब्रायनच्या ५० चेंडूंतील शतकांमुळे त्यांनी इंग्लंडचे ३२७ धावांचे लक्ष्य तीन गडी राखून पार केले. त्यानंतर नेदरलँड्सविरुद्ध त्यांनी ४८ षटकांत ३०७ धावा केल्या, तर २०१५च्या विश्वचषकात आर्यलडने वेस्ट इंडिजने दिलेले ३०५ धावांचे आव्हान ४६ षटकांत लीलया पेलले.

सलग ३४ विजयांची मालिका – ऑस्ट्रेलिया

विश्वचषकावर ऑस्ट्रेलियाचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेपूर्वी हा संघ खराब कामगिरी करत होता, तरी त्यांना विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. १९९९ ते २०११च्या विश्वचषकादरम्यान ऑस्ट्रेलियाचा संघ सलग ३४ सामन्यांत अपराजित राहिला. त्यांपैकी ३२ सामन्यांत त्यांनी विजय मिळवला, तर एक सामना अनिर्णित आणि एक सामना बरोबरीत सुटला. विशेष म्हणजे १९९९मध्ये पाकिस्तानविरुद्ध साखळीत पराभव पत्करल्यानंतर कांगारुंची विजयी मालिका सुरू झाली होती. त्यानंतर २०११मध्ये पाकिस्ताननेच ‘अ’ गटातील लढतीत ऑस्ट्रेलियाला नमवून त्यांची घोडदौड रोखली. सध्या तरी या विक्रमाच्या जवळपासही कोणताच संघ नाही.

मराठीतील सर्व क्रिकेट वर्ल्ड कप 2019 बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Records that will remain unchanged in the remaining two matches abn
First published on: 10-07-2019 at 00:59 IST