या आठवड्यात भारताच्या संघाला दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी उड्डाण करायचे आहे. भारतीय संघ २६ डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार असून त्यानंतर दोन्ही देशांदरम्यान एकदिवसीय मालिका होणार आहे. या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराट कोहलीकडून मर्यादित षटकांचे कर्णधारपद काढून घेण्यात आले आहे. त्याने यापूर्वीच टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून राजीनामा दिला होता. आता अजून एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे, ज्यामध्ये विराट कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका खेळणार नसल्याचे बोलले जात आहे.

क्रिकट्रॅकरच्या वृत्तानुसार, विराट कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतून विश्रांती घेणार आहे. याच दरम्यान म्हणजेच ११ जानेवारीला विराटची मुलगी वामिका एका वर्षाची होणार आहे. त्यामुळे विराट आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवू इच्छित असल्याचे वृत्त आहे. विराटच्या विश्रांतीची बातमी अजून एका कारणासाठी धक्कादायक आहे, कारण त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतून विश्रांती देण्यात आली होती. अशा परिस्थितीत विराट हे पाऊल का उचलत आहे, हा मोठा प्रश्न आहे. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयची अडचण वाढली आहे.

हेही वाचा – तो अ‍ॅक्टिंग करतोय..! ‘या’ कारणावरून रोहित शर्माची लोकांनी उडवली खिल्ली; मीम्स पाहाल तर…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहित शर्मा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याची दुखापत गंभीर असल्याचे सांगण्यात येत असून अशा परिस्थितीत तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तीन सामन्यांची वनडे मालिका खेळू शकणार नाही, असे मानले जात आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआयसमोर आता वनडे मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व कोण करणार हा प्रश्न आहे. विराट कोहलीकडून कर्णधारपद काढून घेण्यात आले असेल, तर तो त्यासाठी उपलब्ध नसेल. बीसीसीआयनेही वनडे मालिकेसाठी टीम इंडियाच्या उपकर्णधाराची घोषणा केलेली नाही.