पुरस्कर्ते आणि चाहत्यांचा ओढा कमी होऊ लागल्यामुळे हॉकी या खेळाचे प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेतील स्थान धोक्यात आले होते. कित्येक वर्षांपासूनच्या हॉकीच्या जुन्या ढाच्यात बदल करून आता या खेळाला नवे रूप देण्यात आले आहे. ७० मिनिटांपर्यंत खेळवला जाणारा हॉकीचा सामना आता ६० मिनिटांवर येऊन ठेपला आहे. १५ मिनिटांच्या चार सत्रात हे सामने खेळवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर पेनल्टी-कॉर्नर मिळाल्यानंतर आणि गोल झाल्यानंतर आनंद साजरा करण्यासाठी ४० सेकंदांचा ‘टाइम-आऊट’ देण्यात आला आहे. हॉकीविश्वाने या क्रांतिकारी बदलाचे स्वागत केले आहे. हॉकी हा खेळ ऑलिम्पिकमध्ये टिकवून ठेवण्यासाठी बदलांची गरज होतीच. त्याचबरोबर खेळ अधिक वेगवान करण्यासाठी तसेच पुरस्कर्त्यांना खेचण्यासाठी हे बदल आवश्यक होतेच, असे मत ‘चर्चेच्या मैदानातून’च्या माध्यमातून हॉकी क्षेत्रातील मंडळींनी व्यक्त केले.

नियम काही वेळेला चांगले वाटतात आणि काही वेळेला वाईटही. पण नव्या नियमांमुळे हॉकी हा खेळ अधिक वेगवान होणार आहे. सामन्याचा कालावधी १० मिनिटांनी कमी झाला असला तरी वेळ कमी राहिल्यामुळे खेळाडूंवर गोल करण्यासाठी अधिक दबाव असणार आहे.  चार सत्रांच्या या खेळात एखादा खेळाडू १० मिनिटे जरी मैदानावर असला तरी त्याला सर्वोत्तम योगदान देता येणार आहे. त्याचबरोबर खेळाडूंना विश्रांतीसाठीही वेळ मिळणार आहे. पूर्वी प्रतिस्पर्धी संघाला पेनल्टी-कॉर्नर मिळाल्यानंतर आमची सुरक्षाकवच घालण्यासाठी तारांबळ उडत असे. पण आता ४० सेकंदांच्या ‘टाइम-आऊट’मुळे आम्हाला एकमेकांशी चर्चा करायला आणि त्यानुसार रणनीती आखण्यासाठी वेळ मिळणार आहे. यामुळे गोलरक्षकांनाही विश्रांती घेण्याची उसंत मिळणार आहे.
युवराज वाल्मीकी, भारतीय संघातील हॉकीपटू

बदललेले नियम खेळाडूंसाठी चांगले आहेत. ७० मिनिटे मैदानावर पळू शकेल, इतकी क्षमता कोणत्याही भारतीय हॉकीपटूकडे नाही. तंदुरुस्तीच्या बाबतीत भारतीय खेळाडू युरोप आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या तुलनेने खूपच मागे आहेत. चार सत्रांच्या या खेळामुळे भारतीय हॉकीपटूंना ऊर्जा परत मिळवण्याची संधी मिळणार आहे. विश्रांतीनंतर ते पुन्हा मैदानावर उतरून आपला सर्वोत्तम खेळ करू शकतात. सत्रांदरम्यान मिळणाऱ्या विश्रांतीदरम्यान जाहिराती दाखवता येऊ शकतात. त्यामुळे हॉकी खेळाकडेही जाहिरातदारांचा कल वाढणार आहे. तांत्रिकदृष्टय़ाही हे नियम खेळाडूंसाठी फारच चांगले आहेत. खेळाडूंना रणनीती आखण्यासाठी वेळ मिळणार आहे. आम्हाला ७० मिनिटांचे सामने पाहायची सवय झाली आहे. पण जागतिक आणि भारतीय हॉकीसाठी बदललेले हे नियम प्रभावशाली ठरतील.
जोकिम काव्‍‌र्हालो, भारताचे माजी प्रशिक्षक आणि हॉकीपटू

आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचा हा निर्णय स्तुत्य असाच आहे. बदल हे कोणत्याही क्षेत्रात हवेच असतात. हॉकी खेळाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी बदल करण्याची आवश्यकता होतीच. गेली दोन वर्षे आम्ही हॉकी इंडिया लीगदरम्यान सामने चार सत्रांत खेळवण्याचे आणि नानाविध प्रयोग केले. त्यामुळे दोन्ही वर्षे हॉकी इंडिया लीगला चाहत्यांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. आता त्याच धर्तीवर आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येही बदल करण्यात आले आहेत. हे हॉकी इंडिया लीगला मिळालेले यशच म्हणावे लागेल. भारतीय हॉकीपटूंना या बदललेल्या स्वरूपानुसार सामने खेळण्याची सवय आधीपासूनच आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याचा फायदा भारतीय खेळाडूंना होणार आहे. नव्या अवतारानुसार भारतीय हॉकी संघाची कामगिरीही सुधारत जाईल, अशी आशा आहे.
नरिंदर बात्रा, हॉकी इंडियाचे महासचिव