काही दिवसांपूर्वीच बीसीसीआय अर्थात ‘बोर्ड फॉर क्रिकेट कंट्रोल इन इंडिया’ यांच्या आर्थिक स्थितीचा अहवाल समोर आला. वर्षभरापूर्वी बीसीसीआयच्या तिजोरीत २०,६८६ कोटी रुपये असल्याचं स्पष्ट झालं. पुढच्या १२ महिन्यात या पुंजीत घसघशीत वाढ झालेली असणार हे नक्कीच. पण मूळ आकडाच अचंबित करणारा आहे. बीसीसीआय देशातल्या क्रिकेटचं नियमन करणारी संस्था आहे. बीसीसीआय केंद्र सरकारकडून निधी घेत नाही. केंद्र सरकारकडून आर्थिक मदत घेत नसल्यामुळे अन्य खेळांच्या राष्ट्रीय संघटनांना जे नियम लागू होतात ते बीसीसीआयला लागू होत नाहीत. २०१९ मध्ये बीसीसीआयच्या तिजोरीत ६०५९ कोटी रुपये होते, ते वाढून २०२४ अखेरीस २०,६८६ कोटी रुपये झाले आहेत. करापोटी बीसीसीआयने ३००० कोटी रुपये चुकते केले आहेत. सामन्यांच्या थेट प्रक्षेपणातून बीसीसीआयला ८१३ कोटी रुपये मिळतात. हे सगळे आकडे एखाद्या राज्याच्या तिजोरीचे वाटू शकतात पण ही एका खासगी क्रीडा संघटनेची ताकद आहे.
बीसीसीआयतर्फे खेळाडूंशी वार्षिक करार केला जातो. टेस्ट, वनडे, टी२० अशा तिन्ही प्रकारात खेळणाऱ्या खेळाडूंना प्राधान्य मिळतं. खेळाडूंसाठी चार श्रेणी तयार करण्यात आल्या आहेत. ए प्लस, ए, बी आणि सी अशा या ४ श्रेणी आहेत. युएईत सुरू असलेल्या आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा सूर्यकुमार यादवकडे आहे. सूर्यकुमार यादव बी श्रेणीत आहे. त्याचं वार्षिक मानधन ३ कोटी रुपये आहे. सूर्यकुमारचं हुकूमी अस्त्र असलेला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ए प्लस श्रेणीत आहे. बुमराहचं वार्षिक मानधन ७ कोटी रुपये आहे. सूर्यकुमारचा साथी अर्थात उपकर्णधार आणि टेस्ट प्रकाराचा कर्णधार शुबमन गिल ए श्रेणीत असून,त्याचं वार्षिक मानधन ५ कोटी रुपये आहे.
बीसीसीआयतर्फे दरवर्षी आयोजित होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक मानधन लखनौ सुपरजायंट्स कडून खेळणाऱ्या ऋषभ पंतला मिळतं. प्रति हंगाम ऋषभला २७ कोटी रुपये मिळणार आहेत. विशेष म्हणजे ऋषभ आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाचा भाग नाहीये. पंजाब संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरचं प्रति हंगाम मानधन २६.७५ कोटी रुपये आहे. प्रत्येक जागेसाठी चुरशीची स्पर्धा असल्यामुळे श्रेयसलाही भारतीय संघात स्थान मिळू शकलेले नाही. सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांच्या यादीत वेंकटेश अय्यर तिसऱ्या स्थानी आहे. कोलकाता संघ त्याला प्रति हंगाम २३.७५ कोटी रुपये देत आहे पण तो निवडसमितीच्या स्कीम ऑफ थिंग्ज अर्थात विचारयोजनेतही नाही.
वार्षिक करार आणि आयपीएल कंत्राट हे खेळाडूंचे वरकरणी दिसणारे उत्पन्नाचे मुख्य स्रोत. याव्यतिरिक्त बहुतांश खेळाडू विविध ब्रँड्सचे सदिच्छा दूत आहेत. त्यांच्या जाहिरातीत झळकतात. त्यामार्गे येणारा पैसा वेगळा. क्रिकेटपटूंनी विविध बिझनेस व्हेंचर्समध्ये कोट्यवधींची गुंतवणूक केली आहे. तो पैसा वेगळा.
पैसा आर्थिक स्थैर्य मिळवून देतो. पैसा तुमच्या चिंता मिटवतं. चांगली जीवनशैली जगण्यासाठी पैसा लागतो. तो मिळाला की आयुष्य सुकर होऊ लागतं. अनेक गोष्टी पैशापायी अडलेल्या असतात. त्या मार्गी लागतात. पण पैसा तुम्हाला निर्भीड करतो का? याचं उत्तर खेदाने नाही असं म्हणावं लागेल. क्रिकेट खेळणाऱ्या १० प्रमुख देशांमध्ये बीसीसीआय धनाढ्य मानलं जातं. बाकी बोर्डांना दत्तक घेऊ शकेल एवढा पैसा बीसीसीआयकडे आहे. आयसीसी म्हणजे क्रिकेटचं नियमन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटनेवरही बीसीसीआयचीच हुकूमत आहे. आयसीसीला पैसा मिळवून देण्यात भारताचा सिंहाचा वाटा आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांचे चिरंजीव जय शाह हेच आयसीसीचे अध्यक्ष आहेत. आशिया कपचं आयोजन करणाऱ्या एशियन क्रिकेट काऊंसिलवरही भारताचाच दबदबा आहे. भारतीय संघाने एखाद्या स्पर्धेतून माघार घेतली किंवा प्राथमिक फेरीतून भारतीय संघ बाहेर पडला तर स्पर्धेचं गणित कोलमडून जातं.
भारतीय खेळाडूंचं फॅन फॉलोइंग थेट मिलिअन्समध्ये आहे. त्यांची एक छबी टिपण्यासाठी हजारो चाहते जमतात. इन्स्टाग्रामवर एखाद्या प्रॉडक्टसंदर्भात पोस्ट करण्यासाठी त्यांना कोट्यवधी रुपये मानधन मिळतं. हे सगळं असलं तरी हे गर्भश्रीमंत भारतीय खेळाडू आम्ही पाकिस्तानविरुद्ध खेळणार नाही हे सांगण्याचं धारिष्ट्य करू शकलेले नाहीत. काही महिन्यांपूर्वी म्हणजे २२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधल्या पहलगाम इथे दहशतवाद्यांनी २६ नागरिकांची हत्या केली. यामध्ये एका विदेशी नागरिकाचाही समावेश होता. देशाच्या कानाकोपऱ्यातून काश्मीर फिरण्यासाठी आलेले नागरिक होते. नंदनवन काश्मीरात रक्ताचे पाट वाहिले. अनेक कुटुंबीयांना आप्तस्वकीयांची पार्थिवं घेऊन घरी परतावं लागलं. या नृशंस घटनेमागे पाकिस्तानचा हात असल्याचं उघड झालं. भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर ही मोहीम हाती घेत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ उद्धस्त केले. पाकिस्तानच्या भ्याड वागण्याला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं. पहलगाम घटनेमुळे भारताने पाकिस्तानशी असलेला व्यापार बंद केला. पाकिस्तानला मिळणारं पाणी बंद केलं. दोन्ही देशांदरम्यानची वाहतूक आधीच बंद होती. आंतरराष्ट्रीय परिषदा, बैठकांमध्ये भारताने पाकिस्तानची निर्भत्सना केली. दहशतवादाला खतपाणी घालणारा त्यांचा खरा चेहरा जगासमोर आणला. हे सगळं झालं तरी भारतीय क्रिकेट संघ आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. सगळी समीकरणं पाहता हे दोन संघ तीनवेळा आमनेसामने येऊ शकतात. आशिया चषकात खेळायलाच हवं अशी भारतीय संघाला अजिबात गरज नाही. बाकी संघांची ती गरज आहे.
दुरावलेल्या संबंधांमुळे भारत-पाकिस्तान आपापसात क्रिकेट मालिका खेळत नाहीत. सोप्या शब्दात सांगायचं तर आपण पाकिस्तानात जात नाही, ते भारतात येत नाहीत. पण आयसीसीतर्फे आयोजित स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना होतो. आशिया कप हा आयसीसी स्पर्धेचा भाग नाही. आशियाई उपखंडातील देशांमध्ये सौहार्द वाढावं यासाठी ही स्पर्धा सुरू झाली. स्पर्धेचा जो मूळ उद्देश आहे त्यालाच पाकिस्तानने हरताळ फासला आहे. तरीही आपण त्यांच्याविरुद्ध खेळणार आहोत. भारतीय संघावर कोणीही खेळण्याची सक्ती केलेली नाही. कारण एशियन क्रिकेट काऊंसिल ही आपलीच जहागीर आहे. आपण बहिष्कार टाकला तर स्पर्धाच होणार नाही. बाकी सगळ्या आघाड्यांवर पाकिस्तानला धारेवर धरलेलं असताना क्रिकेटच्या मैदानात मात्र दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. पहलगाम घटनेशी पाकिस्तानच्या खेळाडूंचा संबंध नाही हे खरंच पण त्यांच्या देशानेच दहशतवादी तळ उभारू दिले हेही सत्य आहे. बाकी ठिकाणी पाकिस्तानसंदर्भात कठोर भूमिका घेतलेली असताना, क्रिकेटमध्ये मात्र नरमाईचं धोरण स्वीकारलं आहे. भारतीय खेळाडूंनी तसंच बीसीसीआयने स्पर्धेतून माघार घेतली तर आर्थिक नुकसान होईल पण हे नुकसान काही दिवसात भरुन निघेल एवढी त्यांची ताकद आहे. तिरंगा, भारतीय लष्कर, राष्ट्रवाद यासंदर्भात भारतीय क्रिकेटपटू नेहमीच सकारात्मक पोस्ट करत असतात. पण प्रत्यक्ष भूमिका घ्यायच्या वेळी त्यांनी मूग गिळणेच पसंत केलं आहे. या संघाविरुद्ध आम्ही खेळणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला नाही. पाकिस्तानला मैदानावर हरवून पहलगाम हल्ल्यातील पीडितांना श्रद्धांजली वाहण्याऐवजी पाकिस्तानविरुद्ध खेळणारच नाही ही भूमिका चाहत्यांना जास्त पटणारी आहे. टीम इंडियाच्या अनेक दर्दी चाहत्यांनी पाकिस्तानविरुद्ध सामना पाहणार नाही अशी भूमिका घेतली आहे. पण भारतीय संघाला अशी भूमिका घेण्याचा ताठ कणा दाखवता आला नाही.
विशेष म्हणजे, दोन महिन्यांपूर्वी लिजंड्स क्रिकेट स्पर्धा झाली. माजी खेळाडूंचे मैत्रीपूर्ण सामने झाले. या स्पर्धेत भारताच्या माजी खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध खेळणार नाही अशी भूमिका घेतली. भारतीय खेळाडू भूमिकेवर ठाम राहिले आणि आयोजकांना सामना रद्द करावा लागला. भारतीय संघाने खेळण्यास नकार दिल्यामुळे पाकिस्तानचा संघ अंतिम फेरीत पोहोचला. पहलगाम हल्ल्यात ज्यांनी जीव गमावला त्यांच्याप्रति आदर म्हणून भारताच्या माजी क्रिकेटपटूंनी कणखर पवित्रा घेतला. पण सध्याच्या खेळाडूंना ते धैर्य दाखवता आलेलं नाही.
पाकिस्तान देशाची आणि क्रिकेट बोर्डाची स्थिती खंगाळ आहे. भारताविरुद्ध खेळता येणं ही त्यांच्यासाठी मोठी संधी आहे. भारतीय संघाला तशी काही गरज नाही. टी२० वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचं जेतेपद भारताच्या नावावर आहे. टेस्ट क्रमवारीत भारतीय संघ चौथ्या स्थानी आहे. वनडे आणि टी२० प्रकारात भारतीय संघ अव्वल स्थानी आहे. भारतात आणि भारताविरुद्ध खेळण्यासाठी बाकीचे संघ आतूर असतात. पाकिस्तानात खेळायला जाणं म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा युएईत खेळवण्यात येत होती. अगदी आतापर्यंत पाकिस्तानचे सामने युएईतच व्हायचे. अशा संघाला खेळण्यासाठी व्यासपीठ मिळवून देण्याचीच गरज नव्हती.पण भारतीय संघाने ती संधी त्यांना मिळवून दिली आहे. शक्तिमानसदृश स्थिती असूनही बीसीसीआय किंवा भारतीय खेळाडूंना जे मनापासून वाटतं ते न सांगता आलं ना कृतीत दाखवता आलं. भारतीय संघाचे जगभर चाहते आहेत. या एका कृतीने त्यांच्याप्रति आदर दुणावला असता पण त्यांनी व्यवस्थेरुपी चाकरीला शरण जायचं ठरवलं.
आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामना सुरू झाला की धर्मयुद्ध, पहलगाम का बदला, सिंदूरची पुनरावत्ती असं सगळं सुरू होईल. मुळात त्यांच्याविरुद्ध न खेळणं हीच चेकमेट करण्याची सर्वोत्तम संधी होती. बीसीसीआयने आणि भारतीय खेळाडूंनी ती गमावली आहे.